होमपेज › Sangli › जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान

जिल्ह्यात ग्रामपंचायतींसाठी 82 टक्के मतदान

Published On: May 28 2018 1:36AM | Last Updated: May 28 2018 12:09AMसांगली : प्रतिनिधी

जिल्ह्यातील  71 सार्वत्रिक आणि 37 ठिकाणच्या पोटनिवडणुकीसाठी आज चुरशीने 82.30 टक्के मतदान झाले. काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा होत्या. काही ठिकाणचा किरकोळ वादावादीचा अपवाद वगळता शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. दरम्यान, मतदान झाल्यानंतर आता मतमोजणी तालुक्याच्या ठिकाणी सोमवार (दि. 28) होणार आहे.  या निकालात काय होणार, याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. 

राज्य निवडणूक आयोगाने गेल्या महिन्यात राज्यातील 654 ग्रामपंचायतींचा सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. त्यात जिल्ह्यातील 82 ग्रामपंचायतींचा समावेश होता.  त्यापैकी  11 ठिकाणची निवडणूक बिनविरोध झाली. त्यात आटपाडी तालुक्यातील वाक्षेवाडी, मुडेवाडी, कानकात्रेवाडी, आंबेवाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातील  झुरेवाडी, पिंपळवाडी, करलहट्टी, शिराळा तालुक्यातील मोरेवाडी, खुजगाव आणि जत- कोनबगी, कडेगाव- वाजेगाव या गावांचा समावेश आहे.  

दरम्यान, 71 ग्रामपंचायतींसाठी 275 मतदान केंद्रांवर  आज सकाळी  साडेसात  वाजता मतदानास सुरुवात झाली. बहुतेक केंद्रांवर सकाळी आणि सायंकाळच्या टप्यात गर्दी होती. मतदारांना कार्यकर्ते मतदान केंद्रांवर घेऊन येत होते. काही ठिकाणी वादावादीचेही प्रकार घडले. शिराळा तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत 88.20 टक्के मतदान शांततेत पार पडले. मिरज तालुक्यातील तीन गावांत 89.35 टक्के मतदान झाले. जत तालुक्यातील चार गावांसाठी 80 टक्के मतदान झाले. कडेगाव तालुक्यातील चिंचणी ग्रामपंचायतीसाठी 83.55 टक्के मतदान झाले. खानापूर तालुक्यातील भेंडवडे, राजधानी भेंडवडे, साळशिंगे  आणि देवनगर  या चार गावांसाठी 81.79 टक्के मतदान झाले. कवठेमहांकाळ तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी 84 टक्क्यांपर्यंत मतदान झाले.

अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी  कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. काही ठिकाणी दुरंगी तर काही ठिकाणी तिरंगी लढती झाल्या. या निवडणुका प्रामुख्याने राजकीय पक्ष्यांपेक्षा स्थानिक गट तटातच होत असल्याने कमालीची चुरस पहायला मिळाली.  प्रशासनाने  निवडणुकीसाठी 1 हजार 402 कर्मचार्‍यांच्या नियुक्ती केली होती. निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार होऊ नये आणि मतदान शांततेत व्हावे, यासाठी कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. 

आता निकालाची उत्सुकता 

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी अपवाद वगळता बुहतेक ठिकाणी चुरशीने मतदान झाले. आज मतमोजणी होणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे निकालात काय होणार, याची उत्सुकता  लागली आहे. काही ठिकाणी लोकांनी निकालावर पैजाही लावल्या आहेत. 

पोटनिवडणुकीसाठी 75.03 टक्के मतदान

जिल्ह्यातील चार तालुक्यातील ग्रामपंचायतीसाठी 75.03 टक्के मतदान झाले. त्यात मिरज 58.65, जत 75.98, विटा 79.07 आणि वाळवा तालुक्यात 81.23 टक्के मतदान झाले.