Thu, Jan 17, 2019 18:26होमपेज › Sangli › शिक्षक भरतीच्या प्रशिक्षणाला ८०० उमेदवार 

शिक्षक भरतीच्या प्रशिक्षणाला ८०० उमेदवार 

Published On: Jul 08 2018 1:45AM | Last Updated: Jul 07 2018 11:41PMसांगली ः प्रतिनिधी

स्थानिक स्वराज्य संस्थांसह खासगी अनुदानित, अंशत: अनुदानित व विनाअनुदानित शाळेत शिक्षक पदासाठी भरती प्रक्रिया ‘पवित्र’ पोर्टलवरून राबविण्यात येणार आहे. त्यासंदर्भात शनिवारी प्रशिक्षण शिबीर झाले. डिसेंबर 2017 मधील अभियोग्यता व बुद्धीमत्ता परीक्षा दिलेले भरतीपात्र 800 उमेदवार तसेच 550 मुख्याद्यापक आणि संस्थाचलकांनी प्रशिक्षणात सहभाग घेतला. प्रशिक्षण दोन सत्रात झाले. 

पवित्र पोर्टलद्वारे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थासह अनुदानित, अंशत: अनुदानित पात्र घोषित केलेल्या विनाअनुदानित प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक विद्यालयांमध्ये शिक्षण सेवक भरती प्रक्रीया करण्याचा शासन निर्णय दि. 20 जून 2018 रोजी झाला आहे. अभियोग्यता व बुध्दीमता चाचणीमधील गुणांच्या आधारे ही भरती होणार आहे.  

‘पवित्र पोर्टल’वर शिक्षक भरतीसाठी पात्र उमेदवारांची नोंदणी तसेच शाळा व संस्थाचालकांनी भरावयाची माहिती यासाठी शनिवारी  विलिंग्डन महाविद्यालयातील वेलणकर हॉल येथे दोन सत्रामध्ये प्रशिक्षण शिबीर झाले. शिक्षणाधिकारी (माध्यमिक) महेश चोथे यांनी मार्गदर्शन केले. 

‘पवित्र पोर्टल’वर नोंदणी करताना काही तांत्रिक अडचणी येण्याची शक्यता आहे. अशावेळी उमेदवारांनी घाबरून जाऊ नये. त्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागात मदत कक्षाची स्थापना केली आहे. त्या ठिकाणी भरतीस पात्र उमेदवार, मुख्याद्यापक यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. या कक्षाची जबाबदारी उपशिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे आणि राहूल म्हसणे यांच्याकडे दिली आहे, अशी माहिती  शिक्षणाधिकारी महेश चोथे यांनी दिली.

पवित्र पोर्टलमध्ये शाळांनी भरायची माहिती, शिक्षकपात्र उमेदवारांना नाव नोंदणीपासून ते पोहोच प्रिंट घेईयपर्यंतची सविस्तर माहिती शिक्षण विभागाच्या तांत्रिक टीमकडून स्लाईड-शोच्या माध्यमातून देण्यात आली.