Fri, May 24, 2019 09:06होमपेज › Sangli › वारणा नदीतून 8 जणांची सुटका

वारणा नदीतून 8 जणांची सुटका

Published On: Jul 21 2018 1:33AM | Last Updated: Jul 21 2018 12:12AMऐतवडे खुर्द : वार्ताहर

संततधार पाऊस आणि चांदोली धरणातून होणारा विसर्ग, यामुळे  वारणा नदीला पूर आला आहे. ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथे या पुरातच शुक्रवारी यांत्रिक बोट बंद पडली. त्यामुळे बोटीतील आठ युवकांचा जीव धोक्यात आला होता. चार तासांच्या अथक प्रयत्नांनंतर त्यांचा जीव वाचला. बचावाचा हा थरार वारणेच्या दोन्ही बाजूंना उपस्थित असलेल्या शेकडो ग्रामस्थांनी अनुभवला.

सन 2005 च्या महापुरानंतर ऐतवडेला यांत्रिक बोट व साहित्य  देण्यात आले होते. सात वर्षांपूर्वीपासून ही बोट वापराविना बंद होती. त्यामुळे या बोटीला लहान छिद्र पडले होते. यांत्रिक इंजिनचाही वापर नव्हता. अशा स्थितीतही ही यांत्रिक बोट घेऊन वारणा नदीच्या पुरात आठ जण आज सकाळी 11 वाचण्याच्या सुमारास गेले. नदीतून जात असतानाच दोनवेळा बोट बंद पडली होती. परंतु, बोट चालवणार्‍या मेस्त्रींनी ती पुन्हा सुरू केली. नदीच्या पलीकडे असलेल्या निलेवाडीच्या बाजूस बोट गेली तेव्हा इंजिनचा फॅन मोडला.

त्यामुळे पुन्हा बोट  बंद पडली.  बोट धारेला लागली. बोटीमधील  राहुल पाटील या युवकाने नीलगिरीच्या झाडाचा आधार घेतला अन् बोट शिकस्तीने थांबवली. थांबलेल्या बोटीमध्ये छिद्रामधून पाणी येत होते. त्यामुळे बोटीमधील युवकांनी पाणी उपसून टाकायला सुरुवात केली.दरम्यान, निलेवाडी ग्रामस्थ मदतीसाठी धावले. त्यांच्या मदतीने रोपच्या सहाय्याने बंद पडलेली बोट नदीकाठाजवळ ओढून घेण्यात आली.   त्यानंतर आठ जणांची सुटका झाली.  सुटकेचा हा थरार चार तास सुरू होता. निलेवाडी ग्रामस्थांनी पुराच्या पाण्यात जाऊन केलेली मदत लाखमोलाची ठरली.