होमपेज › Sangli › नोव्हेंबरअखेर ७० टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफी

नोव्हेंबरअखेर ७० टक्के शेतकर्‍यांना कर्जमाफी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

जत : प्रतिनिधी

राज्यातील 77 लाख शेतकर्‍यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार आहे. कर्जमाफीचा लाभ चुकीच्या लोकांना मिळू नये, यासाठी ऑनलाईन प्रक्रिया करण्यात आली आहे. नोव्हेंबरअखेर 70 टक्के शेतकर्‍यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, अशी माहिती पालकमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

जतमध्ये नगरपालिका निवडणुकीत भाजपचा प्रचार शुभारंभ करण्यात आला. यावेळी खासदार संजय पाटील, आमदार विलासराव जगताप, भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, डॉ. रवींद्र अरळी, प्रकाश जमदाडे, जि.प. शिक्षण सभापती तम्मणगौडा रवी, नगराध्यक्षपदाच्या उमेदवार डॉ. रेणुका अरळी, अ‍ॅड. प्रभाकर जाधव, आरपीआयचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष संजय कांबळे, जि.प. सदस्य सरदार पाटील, सौ. स्नेहलता जाधव, उमेश सावंत आदी उपस्थित होते.

देशमुख म्हणाले, जतचा चेहरा मोहरा बदलू म्हणणारांनीच शहराचा चेहरा मोहरा बिघडविला आहे. आता त्यांनाच बदलण्याची वेळ आली आहे. भाजपचा नगराध्यक्ष व नगरसेवक निवडून द्या. आम्ही या शहरात विकासाचे नवे पर्व सुरू करू. डॉ. रेणुका अरळी यांना नगराध्यक्ष म्हणून संधी द्या. 

आमदार जगताप म्हणाले, पालिकेतील काँग्रेस ही लुटारूंची टोळी आहे. पाच वर्षांत जनतेला लुटण्याचे व प्रत्येक कामात टक्केवारी घेण्याचे काम त्यांनी केले. आता तेच लोक निवडणूक रिंगणात उमेदवार म्हणून आहेत. आता त्यांना बाजूला करण्याची वेळ आली आहे. जत तालुक्यात जो विकास दिसत आहे, तो भाजप सरकारमुळे दिसत आहे. म्हैसाळ योजना, राष्ट्रीय महामार्ग, रस्ते यांच्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आहे. शहराचा विकास करायचा असेल तर यावेळी भाजपला नगरपालिकेत संधी द्या.