Wed, Apr 24, 2019 19:42होमपेज › Sangli › जिल्ह्यात सव्वा लाख एकरावर ठिबक सिंचन

जिल्ह्यात सव्वा लाख एकरावर ठिबक सिंचन

Published On: Dec 27 2017 1:22AM | Last Updated: Dec 26 2017 10:35PM

बुकमार्क करा


सांगली : शशिकांत शिंदे  

पाण्याची बचत करून जास्तीत - जास्त क्षेत्र सिंचनाखाली यावे यासाठी ठिबक आणि तुषार सिंचनाला शासन    प्रोत्साहन देत आहे. त्यासाठी 45 ते 55 टक्केपर्यंत अनुदान शेतकर्‍यांना देण्यात येत आहे. गेल्या आठ महिन्यात जिल्ह्यात एकतीशसे  शेतकर्‍यांना सुमारे सात कोटींचे अनुदान मिळाले आहे. त्यामुळे जिल्ह्यात ठिबक आणि तुषार सिंचनाचे क्षेत्र सुमारे सव्वा लाख एकरांवर गेले आहे. त्यात ऊस आणि द्राक्षांचे सर्वाधिक क्षेत्र आहे. 

जिल्ह्याच्या भौगोलिक परिस्थितीत खूप विविधता आहे. कृष्णा आणि वारणा नद्यांच्या खोर्‍यात काळी सुपीक जमीन आहे. जिल्ह्याच्या इतर भागात मात्र मध्यम आणि मुरमाड जमीन आहे.    नद्यांच्या खोर्‍यात पाणी आणि रासायनिक खतांच्या अति वापरामुळे मोठ्या प्रमाणावर जमीन क्षारपड होऊन नापीक झाल्या आहेत. 

दुसर्‍या बाजूला जिल्ह्याच्या पूर्वभागात द्राक्षे आणि डाळींब बागायतदारांनी कमी पाण्यात पीक येण्यासाठी ठिबक सिंचनचा मार्ग स्विकारला.गेल्या काही वर्षांत  सिंचनाखाली क्षेत्र जास्तीत- जास्त आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. साखर कारखान्यांची संख्या वाढल्यानंतर उसाचे क्षेत्र वाढण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. सुरूवातीस  उपसा सिंचन योजना सुरू झाल्या. मात्र अतिरिक्त पाणी वापरामुळे  क्षारपड जमिनीची समस्या गंभीर झाली. त्यामुळे आता पाणी बचतीसाठी व जमीन वाचवण्यासाठी  बहुसंख्य कारखाने ठिबकसाठी प्रोत्साहन देत आहेत.मार्गदर्शन करीत आहेत. 

जिल्ह्याच्या पूर्व भागात ताकारी, टेंभू आणि म्हैसाळ योजनांचे पाणी गेले आहे. मात्र ते  बारमाही  मिळेल, याची खात्री शेतकर्‍यांना नाही. त्यामुळे तलावात, शेततळ्यात पाणी साठवले जाते. हे पाणी अनेक शेतकरी ठिबक पद्धतीने पिकांना देत आहेत. पूर्वभागात द्राक्षे, डाळींब आणि भाजीपाला पिकांसाठी ठिबकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढतो आहे. 

जिल्ह्यात आता उसासाठीही ठिबकचा वापर वाढत आहे. आतापर्यंत या पिकाखाली ठिबकचे क्षेत्र 40 हजार एकरावर गेले आहे. मात्र एकूण ऊस क्षेत्राच्या तुलनेत हे प्रमाण खूपच कमी  असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे या पिकात ठिबकसाठी मोठा वाव आहे. द्राक्षाचे ठिबक खालील क्षेत्र सुमार 30 हजार एकर आहे. काही अपवाद वगळता बहुसंख्य द्राक्षबागांत आता ठिबकसिंचन पद्धत बापरली जात आहे.