Wed, Sep 19, 2018 18:16होमपेज › Sangli › जिल्हा परिषदेचे 62 टक्के कर्मचारी संपात

जिल्हा परिषदेचे 62 टक्के कर्मचारी संपात

Published On: Aug 08 2018 1:51AM | Last Updated: Aug 08 2018 1:51AMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषद, पंचायत समिती, प्राथमिक शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पशुवैद्यकीय दवाखान्यांकडील 62 टक्के कर्मचारी, शिक्षकांनी संपात सहभाग घेतला. 36 टक्के कर्मचारी आंदोलनाला पाठिंबा देत कामावर उपस्थित होते. दोन टक्के कर्मचारी रजेवर होते. दरम्यान वर्ग 1 व 2 अधिकार्‍यांनी संपात सहभाग घेतला नाही. 

सातवा वेतन आयोग दि. 1 जानेवारी 2016 पासून तातडीने लागू करावा, नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत आलेल्या कर्मचारी, शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी, चवथ्या, पाचव्या व सहाव्या वेतन आयोगापासून जिल्हा परिषद अंतर्गत काम करणार्‍या विविध संवर्गाच्या वेतनश्रेणीतील त्रुटी सातवा वेतन आयोग लागू होण्यापूर्वी दूर कराव्यात यासह विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मंगळवारी लाक्षणिक संप पुकारला होता. जिल्हा परिषद कर्मचारी युनियन, चतुर्थश्रेणी कर्मचारी युनियन, ग्रामसेवक संघटना, विविध शिक्षक संघटना आंदोलनात सहभागी होत्या. दरम्यान राजपत्रित अधिकारी महासंघ, लिपिकवर्गीय कर्मचारी संघटना, कास्ट्राईबने आंदोलनात सहभाग घेतला नाही.  

जिल्हा परिषद कर्मचारी युनियनचे नेते दादासाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष सुभाष मरिगुद्दी, निळकंठ पट्टणशेट्टी, बजरंग संकपाळ, जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण माने, दत्तात्रय पाटील, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचे उज्ज्वला हिप्परकर, सुरेश पाटणकर, स्मिता महामुनी, धनंजय पाटील तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.