Tue, Mar 19, 2019 03:33होमपेज › Sangli › सांगली महापालिकेसाठी 61.24 टक्के मतदान

सांगली महापालिकेसाठी 61.24 टक्के मतदान

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 02 2018 2:01AMसांगली : प्रतिनिधी

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका निवडणुकीसाठी बुधवारी  मतदान पार पडले. यामध्ये काही प्रभागांचा अपवाद वगळता अनेक ठिकाणी संथ गतीने मतदान झाले. 61.24 टक्के मतदान झाले. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत ते 2 टक्के कमीच आहे. सांगली, मिरजेत तीन-चार मतदान केंद्रांवर ईव्हीएम मशिनचा बिघाड झाल्याने गोंधळ निर्माण झाला. काही प्रभागांत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी व भाजप उमेदवार, समर्थकांमध्ये वादावादी होऊन तणाव निर्माण झाला होता. प्रशासनाने मात्र कोणताही अनुचित प्रकार न घडता निर्विघ्नपणे मतदान पार पडल्याचा दावा केला आहे. शुक्रवारी (दि. 3) मतमोजणी होणार असून त्यासाठीही यंत्रणेने तयारी आहे.  त्यादिवशी महापालिकेत सत्ता कोणाची, याचा फैसला होईल.

महापालिका निवडणुकीच्या पाचव्या टर्मसाठी 78 जागांकरिता चारसदस्यीय 18, तर तीनसदस्यीय दोन प्रभागांमध्ये पॅनेल पद्धतीने निवडणूक  झाली. भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीने आघाडी करून निवडणूक लढली. आघाडी, भाजप, शिवसेना, स्वाभिमानी विकास आघाडी, जिल्हा सुधार समिती, लोकशाही आघाडी व अपक्ष असे 451 उमेदवार रिंगणात आहेत. 

तीन शहरांत 544 मतदान केंद्रे सज्ज ठेवण्यात आली होती. मुख्य निवडणूक अधिकारी आणि महापालिकेचे आयुक्‍त रवींद्र खेबुडकर यांनी मतदान वाढावे, यासाठी विविध उपक्रम राबविले होते. शिवाय, मतदारांचे  स्वागत करण्यासाठी काही मतदान केंद्रे  सजविण्यात आली होती; परंतु त्याचा फारसा परिणाम मतदानावर झाला नाही.

आज सकाळी साडेसात  वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली; परंतु मतदान संथ गतीने सुरू होते. दुपारनंतर थोडा वेग आला. दुपारी दीड वाजेपर्यंत 35 टक्के आणि साडेतीन वाजेपर्यंत 48 टक्के मतदान झाले होते. 

शहरातील प्रभाग 10 व मिरजेतील एका केंद्रावर ईव्हीएम मशिनमध्ये बिघाड झाला होता. त्यामुळे धावपळ उडाली; परंतु प्रशासनाने तत्काळ त्रुटी दूर करीत मतदान पूर्ववत केले. शहरातील प्रभाग 15 मध्ये  भोई समाज हॉलमधील केंद्रात ईव्हीएम मशिनला भाजपच्या बटणाला शाई लावल्यावरून आघाडीचे उमेदवार मंगेश चव्हाण, फिरोज पठाण, आरती वळवडे, पवित्रा केरिपाळे आदींनी हरकत घेतली. तसेच कोणतेही बटण दाबले तर भाजपला मत जात असल्याचा आरोपही केला. त्यामुळे मतदानकेंद्रावर गोंधळ निर्माण होऊन मतदानात व्यत्यय निर्माण झाला. 

आयुक्त खेबुडकर, निवडणूक अधिकारी भानुदास गायकवाड, शहर निरीक्षक रविंद्र शेळके यांनी केंद्रावर धाव घेऊन तक्रारी दूर केल्या. त्यानंतर मतदान पूर्ववत सुरू झाले.शहरात काही ठिकाणी मतदारांना आमिष दाखविल्याची तक्रार  तसेच अन्य कारणांनी  उमेदवार समर्थकांत वादावादी झाली. 

आजी-माजी महापौरांसह अनेकांची प्रतिष्ठा पणाला

सर्वच पक्षांत नाराजीचा सूर असल्याने बंडखोरीला उधाण आले. अनेक आजी-माजी नगरसेवकांनी स्वतंत्र किंवा अपक्ष पॅनेल करून आव्हान उभे केले आहे. खणभागात महापौर हारुण शिकलगार यांच्यासमोर नगरसेवक राजेश नाईक यांनी आव्हान उभे केले आहे. शहरात आघाडी असली, तरी सांगलीवाडीत काँग्रेस-राष्ट्रवादी आमने-सामने ठाकली आहेत. माजी आमदार दिनकर पाटील यांचे पुत्र अजिंक्य, दिलीप पाटील, हरिदास पाटील यांच्यात चुरस आहे. मिरजेतही गटनेते किशोर जामदार यांचे पुत्र करण यांच्यासमोर माजी महापौर इद्रिस नायकवडींचे आव्हान आहे.

सांगलीवाडीत उत्साह; 77.50 टक्के मतदान 

तीनही शहरांत मतदानात निरुत्साह दिसून आला, तरी सांगलीवाडीत तिरंगी  लढत  असल्याने मतदानासाठी उत्साह होता. सकाळपासूनच सर्व केंद्रांवर मतदानासाठी रांगा होत्या. सायंकाळपर्यंत मतदार उत्साहाने मतदानासाठी येत होते. सांगलीवाडीत 14 हजारांवर मतदान आहे. त्यापैकी तब्बल 77.50 टक्के म्हणजे 11 हजार 500 हून अधिक मतदान झाले. सर्वच प्रभागांच्या तुलनेत तब्बल 18 ते 20 टक्के हे मतदान जादा आहे.