Fri, Apr 19, 2019 08:51होमपेज › Sangli › मिरजेत चुरशीने 60 टक्के मतदान

मिरजेत चुरशीने 60 टक्के मतदान

Published On: Aug 02 2018 2:01AM | Last Updated: Aug 01 2018 10:31PMमिरज : प्रतिनिधी

महापालिका निवडणुकीत मिरज शहरात बुधवारी सरासरी 60 टक्के मतदान पार पडले. मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली असली तरी काही ठिकाणी इव्हीएम मशीन बंद पडण्याचे प्रकार घडले.  भाजप व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये किरकोळ वादावादीचे प्रकार घडले. मतदाना दरम्यान पैसे वाटपाचेही प्रकार झाल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.

मतदान केंद्राबाहेर शंभर मीटरच्या आत मोबाईलवरुन मतदारांशी संपर्क साधला. तसेच मतदानासाठी बुथवर येणार्‍या मतदारांना आमच्याच पॅनेलला मते द्या, असे सांगणार्‍या दोघांविरुद्ध शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. यामध्ये दामोदर धोंडीराम उबाळे व तानाजी मारुती किणीकर यांचा समावेश आहे. मतदान केंद्रा बाहेरही काही उमेदवारांच्या समर्थकांकडून मतदारांना पैसे वाटण्याचेही प्रकार घडल्याची तक्रार  होती. पोलिसांनी मतदारांना आमिष दाखविण्याचे प्रकार वेळीच रोखल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

सकाळी 7.30 पासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. बहुसंख्य मतदान केंद्रांवर मतदारांत निरुत्साह असल्याचे दिसून आले. मात्र काही मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगाही आढळून आल्या.  संवेदनक्षम भागात भाजप व काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वारंवार संघर्ष होत असलेला दिसत होता. मिरज हायस्कूलमधील मतदान केंद्रावर मशीन बंद पडल्याने काहीवेळ मतदान थांबले होते.  सहा प्रभागात सर्वच ठिकाणी कार्यकर्त्यांनी चुरशीने मतदान करवून घेतले. परंतु तरीही मतदारांमध्ये निरुत्साह असल्याचे जाणवत होते.

सकाळी व दुपारी मतदान केंद्रांवर काही प्रमाणात रांगा दिसून आल्या. परंतु दिवसभर बहुसंख्य मतदान केंद्रावर  गर्दी नव्हती. विद्यामंदीर मधील मतदान केंद्रावर बाबुराव रामचंद्रे शिंदे (वय 92) आणि जवाहर चौकातील मनपा शाळेतील एका मतदान केंद्रावर गौराबाई गंगाराम भंडारे (वय 110 वर्षे) या वृद्धेने मतदानाचा हक्क बजावला.शहरातील काही मतदान केंद्रावर प्रथम येणार्‍या पाच मतदारांचे गुबाल फूल देऊन स्वागत करण्यात आले. तर काही ठिकाणी रांगोळी घालून आणि पताका, मांडव असे केंद्र सजवण्यात आले होते. दिव्यांग आणि आजारी व्यक्तींना मतदान केंद्रापर्यंत नेण्याकरीता व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आली होती.

मिरजेत सर्वच प्रभागात चुरस...

शहरातील सर्व सहाही प्रभागांमध्ये भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात चुरस पहायला मिळाली. एकमेकांविरुद्ध तक्रारी आणि अफवांमुळे पोलिस यंत्रणेलाही धावाधाव करावी लागली. संवेदनक्षम मतदान केंद्रावर जादा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. प्रस्थापित सर्वपक्षीय नेत्यांच्या प्रभागात प्रामुख्याने चुरस पहायला मिळाली.