Sat, Apr 20, 2019 09:57होमपेज › Sangli › 60 हजार टन साखर निर्यातीचे ‘टार्गेट’

60 हजार टन साखर निर्यातीचे ‘टार्गेट’

Published On: May 19 2018 1:35AM | Last Updated: May 18 2018 7:59PMसांगली : विवेक दाभोळे

साखरेचा शिल्लक साठा मोठ्या प्रमाणात असल्याने केंद्र सरकारने निर्यातीसाठी प्रत्येक कारखान्यांना साखर निर्यातीचा कोटा ठरवून दिला आहे. यानुसार जिल्ह्यातील साखर कारखान्यांना  60 हजार 434 टन साखरेची निर्यात करण्याचे ‘टार्गेट’ देण्यात आले आहे. तसेच करमुक्त साखर आयात करण्याचा लाभ घ्यायचा असेल तर निर्यातीच्या ‘लक्ष्यपूर्ती’ चे बंधन करण्यात आले आहे.  दरम्यान, कारखान्यांनी साखर निर्यातीस सुरूवात केली आहे.  

केंद्र शासनाने 20 लाख टन साखर निर्यातीचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक कारखान्यांना सन 2015-16, 16-17 व फे बु्रवारी  2018 पर्यंत उत्पादित केलेल्या साखरेच्या 6 टक्के इतका निर्यात कोटा निश्‍चित करुन दिलेला आहे. सन 2017- 18 च्या हंगामात साखर उत्पादनाचे अंदाज धडाधड उडवून लावत हंगामात साखरेचे उच्चांकी उत्पादन झाले. आरंभीच्या  शिल्लक साखर साठ्याचे न पेलवणारे ओझे घेऊन कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. मात्र हंगामात साखरेचे मोठे उत्पादन झाले. शिल्लक साखरेच्या ओझ्याने साखर कारखान्यांचे अर्थकारण कोंडीत आले.

या संकटात भर म्हणून की जागतिक बाजारात देखील साखरेचे दर कमी झाल्याने निर्यात करुन देखील कितपत फायदा हा सवाल होत होताच. साखर कारखानदारांकडून मात्र निर्यात करण्यासाठी सरकारने अनुदान द्यावे, अशी सातत्याने मागणी होत होती. प्रतिक्विंटल साखर निर्यातीसाठी सरकारने 55 रुपयांचे अनुदान जाहीर केले, मात्र हे कमी असून किमान 150 रु. चे निर्यात अनुदान जाहीर करण्याची मागणी कारखानदार करत असतानाच आता सरकारने कारखान्यांना साखर निर्यातीचा निश्‍चित केलेला कोटा जाहीर केला आहे. यानुसार जिल्ह्यातील कारखान्यांना निर्यात करण्याचे बंधन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील कारखाना निहाय निर्यातीसाठी साखरेचा कोटा सोबतच्या चौकटीत दिला आहे. अर्थात हा कोटा फेब्रुवारी 2018 पर्यंत उत्पादित केलेल्या साखरेवर आहे. केंद्र सरकारच्या ग्राहक कल्याण व सार्वजनिक विभागाचे संचालक (साखर) जी. एस. साही यांनी याबाबतचे आदेश काढले आहेत.