Wed, Apr 24, 2019 19:53होमपेज › Sangli › तासगावात अडीच वर्षात सहा पोलिस निरीक्षकांची बदली

तासगावात अडीच वर्षात सहा पोलिस निरीक्षकांची बदली

Published On: Feb 01 2018 6:58PM | Last Updated: Feb 01 2018 6:58PMतासगाव : प्रमोद चव्हाण

तासगाव पोलिस ठाण्यामधील गेल्या अडीच वर्षात सहा पोलिस निरीक्षकांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अधिकार्‍यांच्या काम करण्यामध्ये राजकीय हस्तक्षेप आल्यामुळे तालुक्यातील गुन्हेगारी वर्गाला संरक्षणाचे वलय मिळत असल्याची दुर्दैवी बाब घडत आहे.

तासगाव पोलिस ठाण्यात काम करणे म्हणजे तारेवरची कसरत असते. एकवेळ गडचिरोली बरी पण तासगाव नको, अशी काहीशी वाक्ये तासगावमध्ये बदली करुन येणार्‍या पोलिस अधिकार्‍यांच्या, कर्मचार्‍यांच्या तोंडून ऐकण्यास मिळतात. याला कारणही तसेच आहे. तालुक्यात भांडणे, वादावादी झाली तरी दोन्ही गटातील नेते फोन करुन विरोधी गटावर कारवाई करण्यास सांगतात. मात्र, यावेळी पोलिसांची मात्र पंचाईत होते. आणि यातूनच त्यांच्या बदली केल्या जातात.

गेल्या अडीच वर्षात तासगाव पोलिस ठाण्यातून चक्क सहा पोलिस निरीक्षकांची बदली करण्यात आली आहे. यातील काही पोलिस निरीक्षक तर एक महिनाच पदावर राहिले आहेत. दरम्यान यामुळे आता तासगावला बदली करुन घेण्यास अनेक पोलिस स्पष्ट नकार देत आहेत. यामुळे तासगाव पोलिस ठाण्याला हक्काचा अधिकारी कधी मिळणार, असा सवाल विचारला जात आहे. तर दुसरीकडे अवैध धंदेवाले मात्र पुन्हा मोकाट सुटत आहेत. 

पोलिस निरीक्षक अनिल तनपुरे यांचीही गुरूवारी रात्री अचानक सांगली मुख्यालय येथे बदली करण्यात आली. तनपुरे हे तासगावला १४ ऑगस्ट २०१७ ला हजर झाले होते. अवघ्या सहा महिन्यांत त्यांची बदली अचानक करण्यात आली. या बदलीपाठीमागे चिंचणी येथे दोन गटात झालेल्या वादावादीची किनार असल्याचे पोलिसांतून बोलले जात आहे. त्यांचा प्रभारी पदभार सहायक पोलिस निरीक्षक उमेश दंडिले यांच्याकडे देण्यात आलेला आहे.

राजकीय हस्तक्षेप थांबवण्याची गरज

अधिकार्‍यांना काम करत असताना जबाबदारीने व निपक्षपातीपणाने काम करावे, अशी वरिष्ठांकडून सूचना केली जाते. मात्र, प्रत्यक्षात त्या त्या भागातील राजकीय नेते मात्र याला भूसुरुंग लावताना दिसतात. यामुळे पोलिस अधिकार्‍यांनी काम नेमके करायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर सातत्याने बदलत असलेल्या अधिकार्‍यांमुळे काळे धंदे करणार्‍यांवर वचक बसवायचा कसा, असा सवालही उपस्थित होत आहे.

अडीच वर्षात बदललेले सहा पोलिस निरीक्षक

दिलीप तळपे   : ३१ मे २०१५ ते १ जुलै २०१५

जितेंद्र शहाणे   : १ जुलै २०१५ ते २७ एप्रिल २०१६

अशोक कदम   : २७ एप्रिल २०१६ ते २ जून २०१६

मिलींद पाटील  : २ जून २०१६ ते ३ जून २०१७

राजन माने    : ३ जून २०१७ ते १४ ऑगस्ट २०१७

अनिल तनपुरे   : १४ ऑगस्ट २०१७ ते २५ जानेवारी २०१८