Fri, Jul 19, 2019 15:53होमपेज › Sangli › 59 हजार कोटींचे बोगस कर्ज शेतकर्‍यांच्या नावावर 

59 हजार कोटींचे बोगस कर्ज शेतकर्‍यांच्या नावावर 

Published On: Sep 08 2018 1:33AM | Last Updated: Sep 08 2018 1:33AMसांगली : प्रतिनिधी

शेतकर्‍यांच्या नावावर 59 हजार कोटींचे कर्ज उचलल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. संपूर्ण पैसा हा कृषी कंपन्यांच्या नावावर आहे, असा आरोप शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

हा संपूर्ण पैसा कॉर्पोरेट क्षेत्राकडे जात आहे. यामुळे या देशातील शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र, याविषयी आमदार, खासदार बोलत नाहीत. शेतकरी आत्महत्येला या देशातील सर्व आमदार, खासदार जबाबदार आहेत, अशी टीका त्यांनी केली.

राजकीय पक्ष, आमदार आणि खासदार हे कॉर्पोरेट क्षेत्राचे पैसे खातात, त्यामुळे ते गप्प आहेत, असे सांगून पाटील पुढे म्हणाले, शेतकर्‍यांमध्ये याबाबत जनजागृती निर्माण करून लढा उभारला जाणार आहे. शेतकर्‍यांसाठी 59 हजार कोटींची तरतूद केली, असे बजेटमध्ये कृषिमंत्री, अर्थमंत्री आणि पंतप्रधान मोठ्या आवाजाने सांगतात. मात्र, सर्व पैसा कॉर्पोरेट क्षेत्राकडे वळविला जात आहे. 

‘दि वायर ’पोर्टलकडून पर्दाफाश

सरकारी बँकांनी 2016 मध्ये देशभरातील केवळ 615 खातेदारांना 59 हजार कोटींचे कृषी कर्ज वाटप केले. म्हणजे सरासरी एका खातेदाराच्या वाट्याला जवळपास 95 कोटींचे कर्ज आले. बँकांनी शेतकर्‍यांच्या नावाखाली बड्या कंपन्यांना कृषिकर्जाची खैरात वाटल्याचे स्पष्ट झाले आहे. ‘दि वायर ’ या ऑनलाइन न्यूज पोर्टलने या बनवाबनवीचा पर्दाफाश केला आहे.  

‘दि वायर’ने माहितीच्या अधिकारात भारतीय रिझर्व्ह बँकेकडून मिळवलेल्या माहितीमध्ये कृषिकर्ज वाटपाचे हे वास्तव उघड झाले आहे. शेतकर्‍यांना शेतीसाठी सुलभ पतपुरवठा व्हावा, या हेतूने कमी व्याजदाराने कृषिकर्ज दिले जाते. तसेच या कर्जासाठीच्या अटी आणि निकषही तुलनेने शिथिल असतात. सध्या शेतकर्‍यांना चार टक्के दराने कृषिकर्ज दिले जाते. याच बाबीचा फायदा लाटण्यासाठी बड्या कंपन्यांनी शेतकर्‍यांच्या नावाखाली स्वस्तात कोट्यवधींची कर्जे घेतली आहेत.