Mon, Jun 17, 2019 03:14होमपेज › Sangli › सांगलीत 59 शिक्षक ‘सक्‍तीने बसून’! 

सांगलीत 59 शिक्षक ‘सक्‍तीने बसून’! 

Published On: Jun 27 2018 1:22AM | Last Updated: Jun 26 2018 8:31PMसांगली : प्रतिनिधी

प्राथमिक शाळा सुरू होऊन अकरा दिवस झाले आहेत. जिल्हा परिषदेच्या शून्य शिक्षकी आठ शाळांचा कारभार तात्पुरत्या कार्यभारावर सुरू आहे. दुसरीकडे मात्र शासनस्तरावरून अद्याप नेमणुकीचे ठिकाण न दिल्याने आंतरजिल्हा बदलीने आलेले 59 शिक्षक जिल्हा परिषदेत बसून आहेत. 

शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्या आणि जिल्हांतर्गत बदल्यांची प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नाही. जिल्हांतर्गत बदल्यांचा आणखी टप्पा होणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत, तर आंतरजिल्हा बदलीने सांगली जिल्हा परिषदेकडे आलेल्या 59 शिक्षकांना अद्याप नेमणुकीचे ठिकाण दिलेले नाही. नेमणुकीचे ठिकाण त्यांना राज्यस्तरावरून मिळणार आहे. आंतरजिल्हा बदलीने हजर झालेल्या टप्पा 2 मधील शिक्षकांना नेमणुकीचे ठिकाण मिळालेले आहे. मात्र टप्पा 1 मधील शिक्षक नेमणुकीच्या ठिकाणाच्या प्रतिक्षेत आहेत. जिल्हांतर्गत बदली प्रक्रियेतून जिल्हा परिषदेच्या 86 शाळा शुन्य शिक्षकी झाल्या होत्या. ही संख्या 8 पर्यंत खाली आली आहे. या शाळांवर नजिकच्या शाळांमधील शिक्षकांची तात्पुरती व्यवस्था केली आहे. 59 शिक्षक नेमणुकीचे ठिकाण न मिळाल्याने जिल्हा परिषदेत बसून आहेत, तर दुसरीकडे शुन्य शिक्षकी आठ शाळा तात्पुरत्या कार्यभारावर सुरू ठेवाव्या लागत आहेत. 

बोगस माहितीप्रकरणी चौकशी अहवाल केव्हा?

गंभीर आजाराबाबत खोट्या प्रमाणपत्राचा आधार घेऊन, खोटी माहिती भरून 70 शिक्षकांनी बदली करून घेतल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आली होती. याप्रकरणी चौकशी होईल. दोषींवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले होते. संवर्ग 1 व संवर्ग 2 च्या लाभासाठी माहिती भरलेल्या सर्व शिक्षकांकडील वैद्यकीय प्रमाणपत्र व अन्य कागदपत्रांच्या तपासणीसाठी समिती नियुक्त केली आहे. या समितीचा अहवाल केव्हा प्राप्त होणार? खोटी माहिती भरून बदलीचा लाभ घेतलेल्यांमुळे विस्थापित झालेल्या शिक्षकांना मूळ शाळा मिळणार का, असा प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.