Fri, Apr 26, 2019 03:20होमपेज › Sangli › ऊस उत्पादकांचे लटकले 550 कोटी

ऊस उत्पादकांचे लटकले 550 कोटी

Published On: Jun 13 2018 1:35AM | Last Updated: Jun 12 2018 10:11PMसांगली : विवेक दाभोळे

जिल्ह्यातील बहुसंख्य साखर कारखान्यांकडे शेतकर्‍यांची तब्बल 525 कोटींहून अधिक रकमेची ऊसबिले थकली आहेत. साखर दरातील चढ-उताराचा फटका म्हणून शेतकर्‍यांना हा फटका सोसावा लागतो आहे. पॅकेज मिळाले, तसेच साखरेचे दर वाढू लागले आहेत. त्यामुळे थकित बिले तातडीने द्यावीत अशी शेतकर्‍यांची मागणी आहे. अन्यथा शेतकरी आंदोलनाच्या तयारीत आहेत.सन 2017-18 च्या हंगामाच्या तोंडावरच  आंदोलनातील तोडग्यानुसार एफआरपी अधिक 200 रुपये असा प्रतिटनासाठी पहिला हप्ता देण्याचा तोडगा निघाला होता.  त्यावेळी जिल्ह्यातील कारखानदारांनी देखील त्याला मान्यता दिली होती. मात्र पुढे साखरेच्या दरात चांगलीच  घसरण झाली, याकडे बोट दाखवित साखर कारखानदारांनी हंगाम सुरू झाल्यानंतरच्या पहिल्या  दोन तीन आठवड्यात ठरल्याप्रमाणे बिले आदा केली, मात्र नंतर अनेक कारखान्यांनी बिले देण्यात हात आखडता घेतला. 

संपलेल्या सन 2017-18 च्या हंगामात जिल्ह्यात तब्बल 80 लाख 29 हजार 323  टन उसाचे गाळप झाले आहे. मात्र  या सर्वच उसाचे बिल शेतकर्‍यांना मिळालेले नाही. सरासरी  29 लाख टन उसाचे बिल शेतकर्‍यांना ठरल्याप्रमाणे मिळाले आहे. मात्र उर्वरित उसाचे पूर्ण बिल मिळालेले नाही. याचा शेतकर्‍यांना आता खरीप हंगामाच्या तोंडावर चांगलाच फटका बसू लागला आहे. 

बड्या कारखानदारांनी देखील झटकले हात

साखरेच्या घसरलेल्या दराकडे बोट दाखवित अनेक बड्या साखर कारखानदारांनी देखील हात झटकले आहेत. मध्यंतरी साखर दरातील घसरणीने आर्थिक संकटात सापडलेल्या कारखान्यांना मदत म्हणून सरकारने प्रतिटनासाठी 55 रुपयांचे अनुदान देण्याची घोषणा केली असली तरी त्याची अंमलबजावणी अद्यापि सुरू झालेली नाही.  अर्थात यातून जिल्ह्यातील शेतकर्‍यांना जेमतेम 50 ते 55 कोटींचा लाभ होणार आहे. थकित ऊस बिलाची रक्कम मात्र पाचशे-सव्वा पाचशे कोटीच्या घरात गेली आहे. याकडे कोणीच लक्ष देत नाही.

संपलेल्या हंगामात प्रथमच साखरेच्या दरातील अभूतपूर्व घसरगुंडी अनुभवण्यास मिळाली. ऑक्टोंबर 2017 मध्ये साखरेचा दर प्रतिक्विंटल 3800 रुपयांच्या घरात होता. यातूनच आता साखर कारखाने शॉर्ट मार्जिनमध्ये आले  आहेत. अर्थात आजच्या साखर दरातील तेजीमुळे या चित्रातच बदल होणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र  या तेजीचा लाभ शेतकर्‍यांना कधी होणार याबाबतचे प्रश्‍नचिन्ह कायमचेच आहे. 

अनेक कारखान्यांना ‘एफआरपी’ देणे देखील  शक्य झालेले नाही. मात्र तरी देखील काहींनी आजअखेर  2500 ते 2600 रुपयांर्पंतचे बिल दिले आहे. मात्र अजूनही अनेक कारखान्यांकडे एफआरपी आणि वरचे 200 अशी सरासरी साडेचारशे रुपयांची प्रतिटन  येणेबाकी आहे. मात्र साखरेचे दर कोसळल्याचे कारण दाखवित कारखानदार बिले देत नसल्याची शेतकर्‍यांची तक्रार आहेे.   आता साखरेच्या दरात तेजी येत असताना याचा लाभ तातडीने शेतकर्‍यांना द्यावा.अन्यथा ऊस उत्पादक  व शेतकरी संघटना आंदोलनाच्या तयारीत आहेत.