Thu, Aug 22, 2019 10:14होमपेज › Sangli › मुक्त संचार गोठा योजनेसाठी 50 टक्के अनुदान

मुक्त संचार गोठा योजनेसाठी 50 टक्के अनुदान

Published On: Jun 22 2018 2:05AM | Last Updated: Jun 21 2018 7:45PMसांगली : प्रतिनिधी

मुक्त संचार गोठा योजनेसाठी जिल्हा परिषद स्वीय निधीतून 1 कोटी रुपये तरतूद झालीआहे. दरम्यान, राज्य शासनाच्या निधीतून शेड व ब्रॉयलर कोंबडी (मासंल पक्षी) अनुदान योजना आणि शेळी गट अनुदान योजनेसाठी दि. 30 जूनपर्यंत पंचायत समितींकडे अर्ज करावेत, असे आवाहन करण्यात आले. जिल्हा परिषदेत बुधवारी पशुसंवर्धन समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी सुहास बाबर होते. सदस्य महादेव दुधाळ, आशाताई झिमूर, मायावती कांबळे,  जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विजय सावंत, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. संजय धकाते व पशुधन विस्तार अधिकारी उपस्थित होते. 

जिल्हा परिषद स्वीय निधीतून मुक्त संचार गोठ्यासाठी कंपाऊड बांधकाम करण्यास प्रती लाभार्थी 43 हजार 881 रुपये अनुदान दिले जाणार आहे. एकूण 1 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. जिल्ह्यात 227 शेतकरी/पशुपालकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे, अशी माहिती बाबर यांनी दिली. एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रमांतर्गत सुधारित जातीची एकदिवशीय कोंबडी पिले वाटप योजना राबविली जाणार आहे. एका लाभार्थीला 100 कोंबडी पिलांसाठी 2 हजार रुपये, खाद्य अनुदानासाठी दोन टप्प्यात 6 हजार रुपये असे एकूण 8 हजार रुपये अनुदान दिले जाणार आहे, अशी माहिती बाबर यांनी दिली. 
दहा अधिक एक शेळी गट आणि एक हजार मांसल पक्षी (ब्रॉयलर कोंबडी) संगोपनाद्वारे कुक्कुटपालनासाठी दि. 30 जूनपर्यंत पंचायत समितीकडे अर्ज करावेत. एक हजार मांसल पक्षी योजनेंतर्गत खुल्या प्रवर्गातील लाभार्थींना शेड व मांसल पक्षांसाठी 1.12 लाख रुपये व मागासवर्गीय लाभार्थींना 1.68 लाख रुपये अनुदान मिळणार आहे.