Thu, Mar 21, 2019 23:24
    ब्रेकिंग    होमपेज › Sangli › नोकरीच्या आमिषाने ५ लाखांची फसवणूक 

नोकरीच्या आमिषाने ५ लाखांची फसवणूक 

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 18 2018 12:31AM

बुकमार्क करा
आष्टा : प्रतिनिधी 

येथील  एका महिलेच्या  मुलीला  शासकीय  नोकरी  देण्याच्या आमिषाने राशिवडे (ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) येथील  पिता-पुत्रांनी  पाच  लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी आष्टा पोलिस ठाण्यात  न्यायालयाच्या आदेशानुसार  बुधवारी रात्री उशिरा  गुन्हा दाखल करण्यात आला. महेश  विजय  पाटील  (वय  28) व  विजय  पांडुरंग  पाटील  (वय 50) अशी संशयितांची नावे आहेत. 

आष्टा पोलिसांनी  दिलेली  माहिती  अशी की, येथील श्रीमती शबनम  मिठुलाल शेख  (वय 50) यांचा  व संशयितांचा गेल्या काही वर्षांपासून परिचय होता. आरोपींचे श्रीमती  शेख यांच्या घरी वेळोवेळी जाणे-येणे  होते. या ओळखीमधूनच संशयितांनी श्रीमती  शेख  यांच्या  पदवीधर मुलीला शासकीय नोकरी देण्याचे आमिष दाखवले.  दि. 20 ते 30 सप्टेंबर 2013  दरम्यान संशयितांनी त्यांच्याकडून प्रथम एक लाख व त्यानंतर चार  लाख रुपये असे एकूण पाच लाख रुपये घेतले.           

संशयितांनी नंतर श्रीमती शेख  यांच्या मुलीला शासकीय नोकरी  मिळवून देण्यास टाळाटाळ  सुरू केली. त्यामुळे  शेख यांनी  त्यांच्याकडे पैसे  परत  देण्याची मागणी केली. त्यानुसार  त्यांनी शेख  यांना  धनादेश दिला. परंतु  तो वटला  नाही. 

संशयितांच्या सांगण्यानुसार शेख  यांनी पुन्हा दोन तीन वेळा धनादेश बँकेत भरला. परंतु  तो वटला नाही. यानंतर संशयितांनी शेख यांच्याकडे  एक ते दीड वर्षांची मुदत  मागून  घेतली. तसेच शेख  यांना  अडीच लाख रुपयांचे  दोन धनादेश दिले. तेही वटले नाहीत.त्यामुळे श्रीमती शेख यांनी सांगली  जिल्हा पोलिस प्रमुख व आष्टा  पोलिस ठाण्यात रजिस्टर पोस्टाने  अर्ज  पाठवला संबंधित  संशयितांविरूद्ध  फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची  मागणी केली. परंतु  पोलिसांनी  त्यांच्या  अर्जाची  दखल घेतली नाही. 

त्यामुळे  श्रीमती  शेख यांनी   न्यायालयात फिर्याद दाखल केली. न्यायालयाने शेख  यांची  मागणी  मान्य केली. आष्टा पोलिसांना  संबंधित  संशयितांविरुध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याचा आदेश दिला आहे.त्यानुसार पोलिसांनी रात्री उशिरा  महेश व विजय  पाटील  यांच्यावर  फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.