Fri, Jul 19, 2019 19:51होमपेज › Sangli › ‘कृष्णा-वारणा’तून उचलले 5 टीएमसी पाणी

‘कृष्णा-वारणा’तून उचलले 5 टीएमसी पाणी

Published On: Jun 30 2018 1:19AM | Last Updated: Jun 29 2018 7:57PMलिंगनूर : प्रवीण जगताप

म्हैसाळ योजनेचे दि. 24 मार्चरोजी सुरू झालेले आवर्तन आता अंतिम टप्प्यात आहे. 90 पेक्षा अधिक दिवस चाललेल्या आवर्तनातून तब्बल पाच टीएमसी पाणी कृष्णा नदीतून उपसा करून दुष्काळी भागात म्हैसाळ योजनेच्या माध्यमातून पोहोचविले आहे. यंदाच्या उन्हाळी आवर्तनावेळी करण्यात आलेल्या वसुलीचा चार तालुक्यांचा आकडाही तब्बल 2 कोटी 29 लाख रुपये इतका आहे. ही माहिती म्हैसाळ उपसा सिंचन आणि व्यवस्थापनचे मुख्य कार्यकारी अभियंता सूर्यकांत नलवडे यांनी दै. ‘पुढारी’ शी बोलताना दिली.

यंदाचे आवर्तन महिनाभर केली गेलेली आणि लक्षवेधी ठरलेली विरोधकांची आंदोलने, खासदार संजय पाटील यांच्यासह जिल्ह्यातील काही आमदारांनी केलेल्या प्रयत्नामुळे अखेर उशिरा का होईना 24 मार्चरोजी योजना सुरू करण्यात आली. यंदाच्या उन्हाळी आवर्तनात सुरुवातीस दोन महिन्यांत सव्वा दोन टीएमसी तर अंतिम महिन्यात वाढलेल्या पंप संख्येमुळे आणि विनाखंड सुरू असलेल्या आवर्तनामुळे आजअखेर पाच टीएमसी पाणी कृष्णा नदीतून उपसा करून दुष्काळी भागात कालवे आणि उपकालवे यांच्याद्वारे पोहोचविले आहे. 

म्हैसाळ योजनेच्या इतिहासात आजवर एकूण संकट काळाकरिता एक्स्टेन्शनसह असणार्‍या एकूण 103 पंपांपैकी अगदी 80 पंप सक्षमपणे सुरू राहिले. तीनही महिन्यात 70 ते 78 ची पंपसंख्या सरासरीने राहिली आहे. यापूर्वी ती फक्त 65 पर्यंत जाऊ शकली होती. सर्व पंप सरासरी 800 ते 1100 अश्‍वशक्ती इतक्या क्षमतेचे असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी उपसता आले. दीड महिने आवर्तन होऊनही जत तालुक्याला क्षमतेने पाणी मिळत नाही, अशी तक्रार जत येथील आमदारांनी केल्यानंतर उपाययोजना करून 100 वरून 150 क्युसेक विसर्ग करण्याचा प्रयत्न यशस्वी केला. वसुलीच्या बाबतीत शासनाच्या 81 टक्के शासनाकडून आणि 19 टक्के शेतकर्‍यांनी बिल भरावयाच्या धोरणाला शेतकर्‍यांनी यावेळी चांगला प्रतिसाद दिला. अर्थात खात्यानेही हे जाणीवपूर्वक प्रबोधन केले त्याचा फायदा दिसून आला. त्यामुळे कमी कष्टात यंदाच्या वसुलीचा आकडा 2 कोटी 29 लाख इतका झाला आहे.

वसुलीत मिरज आघाडीवर 

2 कोटी 29 लाख या रकमेत मिरज तालुक्याने सर्वाधिक सुमारे 1 कोटी 27 लाख रुपये वसुली दिली. कवठेमहांकाळ : 46 लाख 62 हजार रुपये, 

तासगाव : 24 लाख 34 हजार रुपये, जत : 24 लाख 51 हजार इतकी वसुली दिली आहे. दंडातून 7 लाख वसूलविनापरवाना मोटारी बसविणे, टँकरने अथवा वसुली न देता चोरून पाणी शेतीला नेणे अशा गैरप्रकारांना आळा घालत धडक मोहीम हाती घेतली. शेतकर्‍यांच्या मोटारी बंद केल्या तर सुरुवातीस त्यांचे दंड घेऊन वसुलीत रुपांतर केले. हा आकडा सात लाख रुपये इतका आहे. 15 ते 20 हजार हेक्टर क्षेत्र भिजले उन्हाळी आवर्तनातयंदाच्या उन्हाळी आवर्तनातून म्हैसाळ योजनेचे जिल्ह्यातील तीन-चार तालुक्यातील 15 ते 20 हजार हेक्टर क्षेत्र भिजले असल्याचा दावा खात्याने केला आहे. म्हैसाळ योजनेचे मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत, सांगोला आणि मंगळवेढा या सहा तालुक्यातील लाभक्षेत्र 81 हजार 697 हेक्टर इतके तर जिल्ह्यातील तीन तालुक्यातील क्षेत्र 47 हजार हेक्टर आहे. आजअखेर 36 हजार हेक्टर क्षेत्र योजनेच्या कक्षेत आले आहे.

महावितरणने दिली नोटीस 

म्हैसाळ योजना केंव्हाही बंद होण्याची शक्यता आहे. चार दिवसात हा निर्णय होऊ शकतो. कारण वीज तोडणेबाबत महावितरणने दोन दिवसांपूर्वी नोटीस म्हैसाळ योजनेला दिली आहे. त्यामुळे जुलै महिन्यात आता मान्सूनवरच भरवसा ठेवावा लागणार आहे.