Fri, Jul 19, 2019 01:18होमपेज › Sangli › कचरा उठावसाठी 46 रिक्षा घंटागाड्या घेणार

कचरा उठावसाठी 46 रिक्षा घंटागाड्या घेणार

Published On: Sep 01 2018 1:47AM | Last Updated: Sep 01 2018 12:36AMसांगली : प्रतिनिधी

शहरातील कचरा उठावसाठी  40 रिक्षा घंटागाड्या आणि सहा ई रिक्षा घंटागाड्या तसेच औषध फवारणीसाठी 12 गाड्या खरेदी करण्यात येणार आहेत, असे महापौर सौ. संगीता खोत, आयुक्‍त रविंद्र खेबुडकर यांनी पत्रकार बैठकीत सांगितले. 

घनकचरा प्रकल्पांतर्गत ही खरेदी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. शहर स्वच्छतेसाठी आरोग्य विभागाची त्यांनी बैठक घेतली. यावेळी मानधनावर सफाई कर्मचारी, वाहनचालक भरतीसह विविध निर्णय घेतल्याचे खोत व खेबुडकर यांनी सांगितले. 

बैठकीस उपायुक्त सुनिल पवार, उपायुक्त स्मृती पाटील, उपमहापौर धीरज सूर्यवंशी, सभागृह नेते युवराज बावडेकर, आरोग्य अधिकारी डॉ.कवठेकर, नगरसेविका संगीता हारगे, उर्मिला बेलवलकर, गजानन आलदर आदि उपस्थित होते.

सौ.खोत म्हणाल्या, तीनही शहरात कचरा उठाव, औषध फवारणी, स्वच्छता  हे प्रश्न गंभीर बनले आहेत. यावर कामस्वरूपी उपाय आणि तात्पुरते उपाय सुरू करण्यात येणार आहेत. सध्या कार्यरत अनेक घंटागाड्या नादुरुस्त झाल्या आहेत. ज्या दुरुस्त होणार नाहीत त्या बाजूला ठेवून  40 नवीन रिक्षा घंटागाड्या खरेदी केल्या जाणार आहेत. त्याची निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. शासनाच्याच पोर्टलवरून या रिक्षाघंटागाड्यांची खरेदी केल्या जाणार आहेत. सोलापूर महापालिकेने अशा पध्दतीच्या रिक्षा घंटागाड्या खरेदी केल्या
 आहेत.  
औषध फवारणीसाठी  सध्या पालिकेकडे केवळ 8 युनिट आहेत. साथीचे आजार सुरू आहेत. त्यामुळे प्रभागासाठी औषध फवारणीचे मशिन, ट्रॅक्टर खरेदी करता येतील का, यादृष्टीने चर्चा सुरू आहे. भटकी कुत्री पकडण्यासाठी सध्या दोन डॉग व्हॅन आहेत. त्यापैकी एक बंद आणि एकच सुरू आहे. त्यामुळे एक  डॉग व्हॅन खरेदीही केली जाईल.
खेबुडकर म्हणाले, नवीन रिक्षा घंटागाडी खरेदी करताना त्याची रचना ओला कचरा,सुका कचरा टाकला जाईल अशी असेल.   ओला कचर्‍यासाठी आणि सुक्या कचर्‍यासाठी काही वेगळ्या गाड्या फिरतील.  रिक्षा घंटागाड्यांसाठी 40 जादा कर्मचारी मानधनावर घेतले जातील. 

ठाण मांडलेल्यांच्या बदल्या

खेबुडकर म्हणाले, महापालिकेतील एकाच विभागात अनेक वर्षे ठाण मांडून बसलेल्या कर्मचार्‍यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात येतील. प्रत्येकाने कामात पारंगत व्हायला हवे. 

गणेशोत्सव नियोजनासाठी बैठका

सौ. खोत म्हणाल्या, गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर सोमवारी (दि. 3) सायंकाळी 6 वाजता मिरजेत बालगंधर्व नाट्यगृहात मंडळांच्या पदाधिकार्‍यांची बैठक घेतली जाईल. सांगली व कुपवाडसाठी मंगळवारी (दि. 4) दीनानाथ नाट्यगृहात सायंकाळी 5 वाजता बैठक होईल.गणेशोत्सव, मोहरम या सणांनिमित्त तसेच साथीचे आजाराचे प्रमाण कमी व्हावे यासाठी 9 सप्टेंबर रोजी तीनही शहरातील सर्व प्रभागात एकाच दिवशी औषध फवारणीचे महाअभियान राबवले जाणार आहे.