Sun, Nov 18, 2018 20:23



होमपेज › Sangli › ४१ हजार शेतकर्‍यांत ‘अपात्र’चे प्रमाण जास्त!

४१ हजार शेतकर्‍यांत ‘अपात्र’चे प्रमाण जास्त!

Published On: Jan 19 2018 1:56AM | Last Updated: Jan 18 2018 11:38PM



सांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंर्गत राज्यस्तरावर पात्र-अपात्रता निश्‍चित न झालेल्या 40 हजार 515 शेतकर्‍यांमध्ये अपात्रतेचे प्रमाण जास्त असल्याचे संकेत आहेत. सन 2009 पूर्वी व दि. 30 जून 2016 नंतरचे थकीत कर्ज हे कर्जमाफीस पात्र नाही. मात्र त्याकडे दुर्लक्ष करून कर्जमाफीसाठी अर्ज भरल्याची माहिती  छाननीतून पुढे येत आहे. जानेवारीअखेर छाननी पूर्ण होण्याची शक्यता आहे. 

कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ‘ओटीएस’साठी जिल्ह्यातून 1 लाख 83 हजार शेतकर्‍यांनी (कुटुंबे) ऑनलाईन नोंदणी केली होती. त्यापैकी चार टप्प्यात कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदानाचा 87 हजार 523 शेतकर्‍यांना 182 कोटींचा लाभ मिळाला आहे. 26 हजार 494 शेतकर्‍यांना ओटीएस अंतर्गत 188 कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी त्यांनी दि. 31 मार्च 2018 पर्यंत दीडलाखावरील थकबाकीची रक्कम भरावी लागणार आहे. याशिवाय 22 हजार शेतकर्‍यांच्या माहितीतील त्रुटी, चुकांचा डाटा दुरुस्त करून शासनाला सादर केली जात आहे. 

दरम्यान सोमवारी शासनाकडून आणखी 40 हजार 515 शेतकर्‍यांची माहिती जिल्हा बँकेला आली आहे.  अर्जदार शेतकर्‍यांनी अर्जात दिलेली माहिती व बँकेने सादर केलेली माहिती याचा शासनस्तरावर ताळमेळ लागत नाही. त्यामुळे राज्यस्तरावर पात्र-अपात्रता निश्‍चित करता आली नसल्याने या 40 हजार 515 शेतकर्‍यांची माहिती शासनाने जिल्हा बँकेकडे पाठविली आहे.  शासनाकडून आलेल्या या शेतकर्‍यांची यादी व कर्जासंदर्भातील माहिती बँकेच्या संबंधित शाखांकडे पाठविली आहे.  लेखापरीक्षक व बँकेच्या शाखा अधिकर्‍यांमार्फत (तपासणी गट) माहितीची तपासणी होणार आहे.  माहितीची शहानिशा केली जाणार आहे. त्रुटींची दुरुस्ती केली जाणाार आहे. तपासणी गटाने ही कार्यवाही पंधरा दिवसात करायची आहे. तपासणी गटाच्या शिफारशीवर तालुकास्तरीय समितीकडून पात्र-अपात्रतेचा अंतिम निर्णय होईल. उप/सहायक निबंधक यांच्या अध्यक्षतेखालील तालुका समितीने पात्र ठरवलेल्या शेतकर्‍यांना कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएसचा लाभ दिला जाणार आहे. 

शासनाकडून आलेल्या 40 हजार 515 शेतकर्‍यांच्या ताळमेळ न लागलेल्या माहितीपैकी सुमारे शंभर शेतकर्‍यांच्या माहितीची प्राथमिक तपासणी केली असता अपात्रतेचे प्रमाण अधिक दिसून आल्याचे वृत्त आहे. सन 2009 ते दि. 30 जून 2016 या कालावधीतील थकित कर्ज हे कर्जमाफी, प्रोत्साहन अनुदान, ओटीएससाठी पात्र आहे. दि. 30 जून 2016 पर्यंत परतफेड झालेल्या पण 30 जून 2016 नंतरचे कर्ज थकबाकीत राहिलेल्या शेतकर्‍यांनी कर्जमाफी योजनेत अर्ज भरले होते. सन 2009 पूर्वीच्या थकित कर्जदारांनीही कर्जमाफी योजनेच्या लाभासाठी अर्ज भरलेले आहेत. योजनेच्या पात्रतेच्या निकषात सन 2009 ते 30 जून 2016 या कालावधीतील थकित कर्ज बसते. या कालावधीबाहेरचे अर्ज अपात्र ठरत आहेत.