Sun, Aug 18, 2019 21:28होमपेज › Sangli › ताकारी योजनेच्या पाणीपट्टीत  हेक्टरी चार हजारांनी वाढ 

ताकारी योजनेच्या पाणीपट्टीत  हेक्टरी चार हजारांनी वाढ 

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

देवराष्ट्रे : वार्ताहर

जिल्ह्याच्या दुष्काळी भागाला नवसंजीवनी ठरलेल्या ताकारी उपसा सिंचन योजनेच्या पाणीपट्टीत हेक्टरी तब्बल चार हजार रूपयांची वाढ झाली आहे. वीज कंपनीकडून बिलामध्ये कोणतीही सवलत दिली जाणार नसल्याने दरात वाढ झाल्याचे अधिकार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र यामुळे लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांना नुकसान सोसावे लागणार असून मोठा आर्थिक फटका बसणार आहे.

ताकारी योजनेवर सिंचन व्यवस्थापन विभाग कार्यान्वित झाल्याने योजनेच्या लाभक्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे. सन 2014-15 मध्ये 3 हजार हेक्टर क्षेत्र वाढले होते. यामध्ये वाढ होऊन सन 2015-16 मध्ये तब्बल चार हजार हेक्टर क्षेत्र वाढल्याचे दिसत आहे. 

कडेगाव, खानापूर, तासगावसह पलूस आणि वाळवा तालुक्यातील काही भागात ताकारी योजनेच्या छोट्या-मोठ्या कालव्यांचे जाळे निर्माण झाले आहे. ताकारी योजनेतून सहा तालुक्यातील 27 हजार 480 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.वास्तविक योजना सुरू झाल्यापासून 35 वर्षांच्या काळात यापैकी इंच न इंच जमीन ओलिताखाली यावयास हवी होती. परंतु, राजकारणाच्या डोहात नेत्यांची इच्छाशक्ती लोप पावल्याने योजना इतकी वर्षे रखडलेली आहे. 

ताकारी योजनेवर स्वतंत्र सिंचन व्यवस्थापन विभागाची निर्मिती झाल्यांनतर लाभक्षेत्र मोजणी, वसुलीच्या कामात पारदर्शकता आलेली आहे. याचा फायदा योजनेला झाला असून लाभक्षेत्रात मोठ्या 
प्रमाणात वाढ झालेली आहे. ताकारी उपसा सिंचन योजना सुरू झाल्यापासून काही वर्षांच्या फरकाने पाणीपट्टी आकारणीतही वाढ करण्यात आलेली आहे. 

मागील वर्षाची पाणीपट्टी आणि ओलिताखाली आलेले लाभक्षेत्र यांचा विचार केल्यास ताकारी योजनेला या हंगामात अंदाजे 30 कोटी  रुपयांचे उत्पन्न मिळणार आहे. यामुळे वीज बिलाचा प्रश्‍न मिटणार आहे. मात्र शेतकर्‍यांना पाणीपट्टीत वाढ झाल्याने मोठा अर्थिक फटका बसणार आहे.

योजनेच्या उत्पन्नात होणार घसघशीत वाढ

योजनेच्या पाणीपट्टीत वाढ झाल्याने व मागील वर्षीच्या तुलनेत लाभक्षेत्रही तब्बल 4 हजार हेक्टरने वाढल्याने योजेनेच्या उत्पन्नात घसघशीत वाढ होणार आहे. यामुळे चालू हंगामातील वीज बिलाचा प्रश्‍न निकालात निघणार आहे.

सवलत न मिळाल्याने पाणीपट्टीत वाढ : योगिता पाटील

याबाबत ताकारी योजनेच्या उपअभियंता योगिता पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, वीज कंपनीने बिलात सवल न दिल्याने पाणीपट्टीत वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.