Sat, Jul 20, 2019 23:25होमपेज › Sangli › सांगलीत ‘डेंग्यू’चे थैमान; 40 रुग्ण

सांगलीत ‘डेंग्यू’चे थैमान; 40 रुग्ण

Published On: Aug 26 2018 1:29AM | Last Updated: Aug 25 2018 8:23PMसांगली : प्रतिनिधी

कोल्हापूर पाठोपाठ सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातही आता डेंग्यूच्या साथीने थैमान घातले आहे. शहरात सुमारे 40 हून अधिकजण डेंग्यूचे संशयित रुग्ण असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्दी, कणकण, अंगदुखीसह विविध आजारांनी अनेकजण हैराण झाले आहेत. खासगी तसेच शासकीय रुग्णालये  हाऊसफुल्ल आहेत. हवामानातील बदल, साफसफाईचा बोजवारा आणि त्यामुळे डासांचा फैलाव यामुळे साथ पसरू लागली आहे. परंतु महापालिकेचा आरोग्य विभाग सुस्तच आहे. 

कधी ऊन, तर कधी पाऊस असा हवामानाचा खेळ सुरू आहे. यामुळे सर्दी, ताप खोकल्याच्या माध्यमातून डेंग्यूसदृश आजार बळावतो आहे. त्यामुळे गावभाग, खणभाग, विश्रामबाग, संजयनगर, शंभरफुटीवरील शामरावनगर ते धामणी रस्ता तसेच कुपवाड मिरजेतही मोठ्या प्रमाणात डेंग्यूसदृश आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरली आहे. 
येथील पटेल चौक परिसरात एकाच ठिकाणी पाचपेक्षा अधिक रुग्ण आढळून आले आहेत. हरिपूर रोडवरील उपनगरांमध्येही मोठ्या प्रमाणात साथीचा फैलाव झाला आहे. 

शहरातील कचरा उठाव, सफाईचा बोजवारा आहे. खुल्या भूखंड तसेच रस्त्याकडेला साचलेल्या कचरा, झाडे-झुडुपांमध्ये पाणी साचते. त्या पाण्यात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे डासांच्या माध्यमातून साथीचा फैलाव होऊ लागला आहे. साथीच्यावेळी वेळीच उपचार होणे गरजेचे असते. परंतु नागरिक सर्दी-ताप समजून स्वतःच गोळ्या-औषधे घेतात. त्यामुळे काहीवेळेला आजार बळावतो. सांगलीतील एका रुग्णाला वेळीच निदान न झाल्याने मुंबईला उपचारासाठी हलविण्याची वेळ आली आहे.

एवढ्या मोठ्या प्रमाणात साथीचा फैलाव होऊनही महापालिकेकडून कुठेही औषधफवारणी किंवा साथीच्या आजाराबद्दल सर्वे होत नसल्याचे चित्र आहे. वास्तविक गेल्या 15 दिवसांत हे प्रमाण वाढले आहे. खासगी रुग्णालये हाऊसफुल्ल आहेत. सांगली, मिरज सिव्हिलमध्येही रुग्णांची संख्या  वाढलेली आहे. परंतु अजूनही महापालिका यंत्रणा निवडणूक वातावरणामधून बाहेर आलेली नाही. दुसरीकडे नगरसेवक, पदाधिकार्‍यांनी कामकाजाला सुरुवात केली नसल्याने यंत्रणा सुस्तच आहे. ती केव्हा जागी होणार , असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहे.

ही आहेत डेंग्यूची लक्षणे 

डॉ. बिंदूसार  पलंगे म्हणाले,  दरवर्षी पावसाळ्यामध्ये डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असते. त्यातच हवामानात सतत  होणार्‍या बदलाने आजार बळावतो. सध्या तसे हवामान आहे. डासांच्या तसेच संसर्गाच्या माध्यमातून डेंग्यूसद‍ृश्य आजार फैलावतो. यामध्ये  अंग दुखणे, हाडे दुखणे, ताप येणे, प्लेटलेट कमी होणे अशी लक्षणे दिसतात. परंतु ही लक्षणे डेंग्यूची नसून डेंग्यूसद‍ृश्य आजाराची असतात. त्यामुळे तातडीने उपचार केल्यास हा आजार बरा होऊ शकतो. त्यामुळे रुग्णांनी न घाबरता स्वत:ची काळजी घेणे आवश्यक आहे.

खुले भूखंड बनले डास उत्पत्तीचे अड्डे

तीनही शहरात उपनगरे तसेच मध्यवर्ती वस्त्यांमध्ये हजारांहून अधिक खुले तसेच आरक्षित भूखंड रिकामे आहेत. येथील पत्रकारनगर व परिसरातही अनेक भूखंडांवर झुडपे वाढली आहेत. तेथे पाणी साचते तसेच कचर्‍याचे ढीग साचले आहेत. हे भूखंड डास उत्पत्तीचे अड्डेच बनले आहेत. त्यामुळे साथीच्या आजारांच्या फैलावाला बळ मिळत आहे. तेथे साफसफाई औषफवारणी होतच नाही. वास्तविक अशा भूखंडांच्या मालकांवर कारवाईबाबत अनेकवेळा महापालिका सभांमध्ये चर्चा झाली. पण अंमलबजावणी झालीच नाही.