Wed, Aug 21, 2019 02:54होमपेज › Sangli › सांगलीत ४० लाखांची रोकड जप्त

सांगलीत ४० लाखांची रोकड जप्त

Published On: Jan 18 2018 1:45AM | Last Updated: Jan 18 2018 12:37AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

शहरातील मंगळवार बाजार परिसरात एका आलिशान कारमधून पोलिसांनी चाळीस लाख रुपयांची रोकड जप्त केली. बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. मिरज तालुक्यातील काननवाडीचे सरपंच अनिल शेगुनशे यांच्या गाडीतून ही रोकड जप्त करण्यात आली. याबाबत आयकरच्या आयुक्‍तांना माहिती देण्यात आली असल्याचे पोलिस निरीक्षक रमेश भिंगारदेवे यांनी सांगितले. 

याप्रकरणी अनिल दादा शेगुनशे (वय 37, रा. काननवाडी) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. निरीक्षक भिंगारदेवे यांचे एक पथक आज दुपारी मंगळवार बाजार परिसरात गस्त घालत होते. दुपारी दीडच्या सुमारास एक कार (एमएच 10 व्हीजे 1008) संशयास्पदरीत्या थांबल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी कारचालक शेगुनशे यांच्याकडे चौकशी केली. नंतर कारची झडती घेण्यात आली. त्यावेळी कारच्या डिकीमध्ये एका पिशवीत पाचशे रुपयांची काही बंडले असल्याचे पोलिसांना दिसून आले. त्याबाबत चौकशी करण्यासाठी शेगुनशे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. 

शेगुनशे यांच्यासह कार संजयनगर पोलिस ठाण्यात आणण्यात आली. नंतर शेगुनशे यांच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने आपण इस्टेट एजंट असून त्याची ही रक्‍कम असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानंतर त्या पिशवीतील नोटांची मोजणी करण्यात आली. त्यावेळी पाचशे रुपयांची 80 बंडले असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. ही रक्‍कम 40 लाख रुपये असल्याचे निरीक्षक भिंगारदेवे यांनी सांंगितले. याबाबत शेगुनशे यांच्याकडे अधिक चौकशी करूनही ते समाधानकारक उत्तरे देऊ शकले नाहीत. त्यामुळे पोलिसांनी या कारवाईबाबत आयकर विभागाच्या आयुक्तांशी संपर्क साधून त्यांना याची माहिती दिली. रात्री उशीरापर्यंत चौकशी करून शेगुनशे यांना सोडून देण्यात आले. मात्र रोकड आणि कार पोलिसांनी जप्त केली आहे. 

निरीक्षक भिंगारदेवे, सहाय्यक निरीक्षक प्रशांत पाटील, उपनिरीक्षक दादासाहेब बुधावले, दिनेश माने, मंगेश गुरव आदींच्या पथकाने ही कारवाई केली. दरम्यान, आयकरकडून चौकशीनंतर या प्रकरणाचा उलगडा होणार आहे.