Fri, Apr 26, 2019 16:03होमपेज › Sangli › अवैध वाळूचे 4 ट्रक जप्त, चौघांवर गुन्हा

अवैध वाळूचे 4 ट्रक जप्त, चौघांवर गुन्हा

Published On: Feb 12 2018 2:05AM | Last Updated: Feb 11 2018 11:37PMसांगली : प्रतिनिधी

जत-सातारा रस्त्यावर अवैधरित्या वाळू वाहतूक करणारे चार ट्रक शनिवारी रात्री पकडून जप्त करण्यात आले. याप्रकरणी चारही ट्रक चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ट्रकचे मालक मात्र पसार झाले आहेत. यावेळी चार ट्रक, त्यातील पंचवीस ब्रास वाळू असा तीस लाखांचा माल जप्त करण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरीक्षक राजन माने यांनी दिली. 

सतीश बाळासाहेब नाईक (वय 30, रा. नांगोळे, ता. कवठेमहांकाळ), धनाजी कुंडलिक दोदले (वय 27, रा. सोरडी, ता. जत), संतोष महादेव पाटील (वय 28, रा. शिरढोण, ता. कवठेमहांकाळ), जयकुमार लक्ष्मण फोंडे (वय 23, रा. दुधेभावी, ता. कवठेमहांकाळ) अशी अटक करण्यात आलेल्या ट्रक चालकांची नावे आहेत. यातील संशयित ट्रक मालक पिंटू नाईक (रा. कवठेमहांकाळ), दादासाहेब हिप्परकर (रा. जत), बंडू पाटील (रा. शिरढोण), सचिन महादेव यमगर (रा. बिरनाळ, ता. जत) पसार झाले आहेत. 

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा, अतिरिक्त अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्याचे आदेश स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला दिले होते. त्यानुसार निरीक्षक माने यांनी अधिकारी व कर्मचार्‍यांची तीन पथके तयार केली. जत-सातारा रस्त्यावर अशी वाहतूक सुरू असल्याची माहिती त्यांना खबर्‍याकडून मिळाली होती. त्यामुळे जत-सातारा रस्त्यावर त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी तीन पथके तैनात केली होती. 

मध्यरात्रीच्या सुमारास एकामागोमाग चार ट्रक आल्याने पथकाला संशय आला. ट्रक चालकांकडे चौकशी केल्यानंतर सुरूवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यांच्याकडे सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी उंब्रज (कर्नाटक) येथून ही वाळू आणल्याची कबुली दिली. त्यानंतर चारही ट्रक वाळूसह जप्त करून जत पोलिस ठाण्यात नेण्यात आले. 

याप्रकरणी चारही ट्रक चालकांना अटक करण्यात आली असून मालकांविरोधातही जत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निरीक्षक माने यांच्या नेतृत्वाखाली उपनिरीक्षक प्रवीण शिंदे, शशिकांत जाधव, महादेव नागणे, सचिन कनप, चेतन महाजन आदींच्या पथकाने ही कारवाई केली. 

नाईकवर खोट्या नावाचा गुन्हा

यातील संशयित ट्रक चालक सतीश नाईक याने सुरूवातीला स्वतःचे नाव शिवाजी गंगाराम मंडले (वय 27, रा. वाघोली, ता. कवठेमहांकाळ) असे असल्याचे सांगितले. मात्र नंतर त्याचे नाव स्पष्ट झाले. त्यामुळे त्याच्यावर खोटे नाव सांगितल्याप्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आल्याचे निरीक्षक माने यांनी सांगितले.