Mon, May 27, 2019 09:13होमपेज › Sangli › ‘वॉटर कप’ स्पर्धेतील गावांना ४ कोटींचा प्रोत्साहन खर्च

‘वॉटर कप’ स्पर्धेतील गावांना ४ कोटींचा प्रोत्साहन खर्च

Published On: May 13 2018 2:17AM | Last Updated: May 12 2018 8:41PMसांगली : प्रतिनिधी

पाणी फौंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेतील 264 गावांना मशीनद्वारे करण्यात येणार्‍या कामांकरिता इंधन खर्चासाठी प्रोत्साहन म्हणून प्रत्येक गावाला 1.50 लाख रुपये मर्यादेत प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे. त्यासाठीचे 3 कोटी 96 लाख रुपये जत, आटपाडी, खानापूर, तासगाव आणि कवठेमहांकाळ पंचायत समितींना वर्ग केले आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांनी दिली. 

जलयुक्त शिवार योजनेतील 3.96 कोटी रुपयांचा निधी हा वॉटर कप स्पर्धेतील सहभागी गावांना प्रोत्साहन निधी म्हणून दिला जाणार आहे. जी गावे वॉटर कप स्पर्धेत सहभागी होऊन मृद व जलसंधारणाची कामे श्रमदानाद्वारे करतील अशाच गावांना मशीनद्वारे करण्यात येणार्‍या कामांसाठी इंधन खर्चासाठी प्रत्येक गावाला 1.50 लाखांच्या मर्यादेत प्रोत्साहन निधी दिला जाणार आहे, अशी माहिती राऊत यांनी दिली.  

मशीनद्वारे प्रस्तावित काम पूर्ण झाल्यानंतर संबंधित विभागाच्या क्षेत्रिय कर्मचार्‍यामार्फत मोजमाप घेतले जाणार आहे. झालेल्या कामानुसार इंधनाची रक्कम गावाला वर्ग करण्यात येणार आहे. ग्रामपंचायतीने कामनिहाय झालेल्या निधी खर्चाचा प्रस्ताव गट विकास अधिकारी यांना सादर करायचा आहे. या प्रस्तावावर सरपंच, ग्रामसेवक, संबंधित विभागाचा तांत्रिक कर्मचारी व वॉटर कप सदस्याची शिफारस बंधनकारक आहे. तांत्रिक कर्मचार्‍याकडून मूल्यांकन झाल्यानंतर प्रांताधिकारी यांच्या समितीच्या आदेशानंतर ग्रामपंचायतीस निधी वर्ग होईल.