Tue, Apr 23, 2019 19:36होमपेज › Sangli › बोरगावजवळ 4 एस.टी. बस फोडल्या

बोरगावजवळ 4 एस.टी. बस फोडल्या

Published On: Jul 27 2018 1:26AM | Last Updated: Jul 27 2018 1:26AMबोरगाव : वार्ताहर

मराठा आरक्षण आंदोलनाला गुरूवारी वाळवा तालुक्यात हिंसक वळण लागले. ताकारी-इस्लामपूर मार्गावर बोरगाव येथे मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात आंदोलकांनी 4  एस.टी. बसेस फोडल्या. यामध्ये 3 प्रवासी जखमी झाले आहेत. 

सोमवारी 11 वाजण्याच्या सुमारास ताकारीहून इस्लामपूरकडे निघालेल्या इस्लामपूर आगाराच्या पलूस-इस्लामपूर, रेठरेहरणाक्ष-इस्लामपूर व  पलूस आगाराच्या 2 एस.टी. बस शिवाजीनगर परिसरात मोटारसायकलवरून आलेल्या 6 अज्ञात तरुणांनी थांबवून एस.टी. वर जोरदार दगडफेक केली. यामध्ये चारही एस.टी. बसच्या पाठीमागील बाजूच्या काचा फुटल्या. या दगडफेकीत बसमधील 3 प्रवासी जखमी झाले. 

दगडफेकीनंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या तरुणांनी एस.टी. बस थांबवून चालकाला दोघाजणांनी बाजूला नेऊन इतरांनी एस.टी. वर दगडफेक केली. या दगडफेकीत पाठीमागील काचा व बाजूच्या खिडक्याही फुटल्या आहेत. दगडफेकीमुळे प्रवासीही भयभीत झाले होते. या दगडफेकीनंतर इस्लामपूर-ताकारी मार्गावरील एस.टी. फेर्‍या बंद करण्यात आल्या. याची इस्लामपूर पोलिस ठाण्यात नोंद झाली असून पोलिसांनी अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पलूसमध्ये ठिय्या आंदोलन

पलूस : प्रतिनिधी

मराठा समाजाला राज्य सरकारने तातडीने आरक्षण द्यावे, या मागणीसाठी पलूस शहर मराठा समाजाच्यावतीने गुरुवारी शहरातील मध्यवर्ती चौकात तब्बल तीन तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. शहरात दिवसभर कडकडीत बंद पाळण्यात आला. दरम्यान, आंदोलकांनी वाहने रोखून धरली. वाहतूक ठप्प झाली होती.
मराठा समाजाच्यावतीने पलूस बंद ठेवण्याचे आवाहन बुधवारी करण्यात आले होते. सर्व लहान-मोठे व्यापारी, वाहन चालकांनी उत्स्फूर्तपणे या आंदोलनात भाग घेतला.  जुन्या बसस्थानक चौकात  प्रमुख कार्यकर्ते  आणि इतर विविध संघटनांच्या पदाधिकार्‍यांनी घोषणा देत चौकातच ठिय्या मारला. यावेळी चारी बाजूची वाहतूक ठप्प झाली होती.
जगदीश पाटील, दिगंबर पाटील, सुहास पुदाले, अमर इनामदार, भरत इनामदार, प्रकाश पाटील, रमेश नलवडे यांच्यासह अनेकांनी मनोगत व्यक्‍त केले. यावेळी त्यांनी मराठा आरक्षण तातडीने देण्यासह कोपर्डी घटनेतील आरोपींना दिलेल्या फाशीच्या शिक्षेची तातडीने अंमलबजावणी करावी, मराठा समाजाच्या विकासासाठी राजर्षी शाहू महाराज संशोधन मानव विकास संस्था सुरू करा आदी मागण्या करण्यात आल्या. दुपारी तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले. मंगळवारी रात्री आंधळी - राजापूर दरम्यान एस. टी. बसवर  झालेली दगडफेक आणि राज्यभरात आंदोलनाचा उडालेला भडका या पार्श्‍वभूमीवर  पोलिस  उपअधीक्षक अशोक बनकर यांच्या मार्गदर्शनाखाली 6 पोलिस निरीक्षक, 55 पोलिस, राज्य राखीव पोलिस दलाची तुकडी  तैनात करण्यात आली होती.

मराठा आरक्षणासाठी मांजर्डेत बंद

मांजर्डे : वार्ताहर

मांजर्डे (ता. तासगाव) येथे मराठा क्रांती मोर्चाच्यावतीने गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. यावेळी मराठा आरक्षण तात्काळ देण्याची मागणी करण्यात आदी. बंददरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. सकाळी  तरुणांनी गावात फेरी काढून दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले.