Fri, Apr 19, 2019 11:59होमपेज › Sangli › ३५ लाखांचा गुटखा येलूरजवळ जप्‍त

३५ लाखांचा गुटखा येलूरजवळ जप्‍त

Published On: Dec 11 2017 1:34AM | Last Updated: Dec 11 2017 12:05AM

बुकमार्क करा

कुरळप : वार्ताहर

कुरळप पोलिसांनी  गुटखा घेऊन जाणारा ट्रक शनिवारी रात्री येलूरजवळ पकडला.  ट्रकसह बाजारभावाने या गुटख्याची किंमत 35 लाख रुपये आहे. शनिवारी रात्री उशिरा नाकाबंदीच्या वेळी कुरळप पोलिसांनी ही कारवाई केली. याप्रकरणी कर्नाटकातील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान, अन्‍न व औषध प्रशासनाने गुटखा ताब्यात घेतला आहे. 

ट्रकचालक इरनगोंड शिवनगौड फकीरगौर (वय 28, रा. बल्लूर, जि. धारवाड) व त्याचा सहकारी सिद्दनगोड हिरनगोड चिकनगौर  (वय 21, रा. हुबळी, जि. धारवाड) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. शनिवारी रात्री पुणे-बंगळुरू महामार्गावर कुरळप पोलिस ठाण्यातील पोलिस नाकाबंदी करीत होते. त्यावेळी बंगळुरूकडून एक ट्रक (के.ए. 25 ए 1789) पुण्याच्या दिशेने निघाला होता. तो ट्रक पोलिसांनी अडविला. 

यावेळी चालक फकीरगौर याच्याकडे पोलिसांनी ट्रकमधील मालाबाबत चौकशी केली. त्यावेळी त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यानंतर चालक फकीरगौर व चिकनगौर यांना ताब्यात घेऊन ट्रकची तपासणी केल्यानंतर त्यामध्ये गुटखा आढळला. त्यानंतर पोलिसांनी ट्रकसह दोघांनाही पोलिस ठाण्यात नेले. तेथे त्यांच्याकडे अधिक चौकशी केल्यानंतर ते हा गुटखा राजस्थानकडे घेऊन जात असल्याचे त्यांनी सांगितले. 

आज सकाळी वरिष्ठ अन्न सुरक्षा सहाय्यक डी. एच. कोळी, नमुना सहाय्यक पी. के. कवळे,  साबळे यांनी कुरळप पोलिस ठाण्याला भेट दिली. त्यानंतर त्यांनी पाहणी करून गुटखा ताब्यात घेतला. त्यावेळी दोघाही संशयितांना अन्न व औषध प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले आहे. राज्यात बंदी असतानाही गुटख्याची विक्री केल्याप्रकरणी दोघाही संशयितांवर अन्न- सुरक्षा कायद्यानुसार कारवाई करणार असल्याचे कोळी यांनी सांगितले.