Sun, Jan 20, 2019 11:12होमपेज › Sangli › कडेगाव तालुक्यात ३४२ मुले कुपोषित

कडेगाव तालुक्यात ३४२ मुले कुपोषित

Published On: Feb 13 2018 2:00AM | Last Updated: Feb 12 2018 8:46PMदेवराष्ट्रे : वार्ताहर

कडेगाव तालुक्यात 342 मुले कुपोषित असल्याचे  उघड झाले आहे.  याबाबत कडेगाव पंचायत समितीच्या  सभापती मंदाताई करांडे यांच्याकडून विशेष प्रयत्न होत असताना  प्रशासनाचे  मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.

कडेगाव तालुक्यात मध्यम कमी वजनाची (एम. यु. डब्ल्यू) : 241 मुले, तीव्र कमी वजनाची (एस. यु.डब्ल्यु) : 29 मुले यामध्ये दोन दुर्धर तसेच उंचीनुसार (एम. ए. एम.) 65 मुले व एस. ए. एम. 7 यामध्ये एक दुर्धर अशी 342 मुले कुपोषित असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्य शासनाकडून कुपोषण मुक्तीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. यामध्ये या मुलांची विशेष आरोग्य तपासणी तसेच औषध पुरवठ्यासह शालेय पोषण आहार व लोकवर्गणीतून अतिरिक्त पोषक व पूरक आहार देण्यात येतो आहे.

याबाबत पर्यवेक्षिका  भारती चौधरी यांनी सांगितले, कुपोषित मुलांना अंगणवाडीमध्ये पोषक आहार दिला जात आहे. यासाठी लोकवर्गणी जमा केली जात आहे.  यात मध्यम कमी वजनाची व तीव्र कमी वजनाच्या मुलांना योग्य व पूरक आहार आणि औषध उपचार केल्यास ही मुले सामान्य होऊ शकतील.

आयएसओ मानांकन  अंगणवाड्यांतही कुपोषित मुले

तालुक्यातील काही अंगणवाड्यांना मागील काही दिवसांमध्ये आयएसओ मानांकन देऊन गौरविण्यात आले आहे. मात्र या अंगणवाड्यांतही कुपोषित मुले असल्याचे   चित्र  आहे.  त्यामुळे आयएसओ मानांकन नावालाच असल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, कुपोषित मुलांसाठी शासनाने लोकवर्गणी जमा करून अतिरिक्त पोषक व पूरक आहार देण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार कडेगाव तालुक्यात वस्तूरूपात 25 हजार रुपयांची लोकवर्गणी जमा झाल्याची माहिती भारती चौधरी यांनी दिली.