Fri, Apr 19, 2019 12:37होमपेज › Sangli › सहायक आयुक्‍तांसह ३३ जणांच्या दांड्या

सहायक आयुक्‍तांसह ३३ जणांच्या दांड्या

Published On: Dec 17 2017 2:13AM | Last Updated: Dec 16 2017 11:50PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

महापालिकेच्या सहाय्यक आयुक्‍तांसह विविध विभागातील 33 कर्मचार्‍यांनी शनिवारी कामावर दांडी मारली. स्थायी समिती सभापती बसवेश्‍वर सातपुते यांनी कामगार अधिकारी चंद्रकांत अडके, सदस्य दिलीप पाटील यांच्यासोबत शनिवारी पर्दाफाश केला. यातील अनेकजणांच्या दोन ते 15 दिवस हजेरीबुकात सह्या नसल्याचे आढळून आले आहे. त्यांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्याचे सातपुते यांनी सांगितले.

याबाबत सातपुते म्हणाले, अनेक कर्मचारी सकाळी हजेरी लावून दिवसभर गायब होतात. त्यामुळे नागरिकांच्या कामाची गैरसोय होत असल्याच्या तक्रारीे आल्या होत्या. त्यामुळे मी अडके, पाटील यांना घेऊन अचानक प्रभाग समिती एकच्या कार्यालयाची तपासणी केली. 

यावेळी सहाय्यक आयुक्त एस.व्ही.पाटील यांनी गेल्या पंधरा दिवसांपासून हजेरी पुस्तकावर सही केली नसल्याचे आढळून आले. ते शनिवारी पुणे दौर्‍यावर गेले होते. त्यांच्यासह सहा कर्मचार्‍यांची देखील गैहजेरी होती. सातपुते यांनी या सर्वांचे पगार कपात करून कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी पाणीपुरवठा व ड्रेनेज विभागाकडे मोर्चा वळविला.  या ठिकाणी अनेक टेबल रिकामी आढळून आली. 

ते म्हणाले, पाणीपुरवठा विभागात कायम काम करणारे सात आणि मानधनावरील नऊ कर्मचार्‍यांच्या हजेरी पुस्तकावर सह्या नव्हत्या. तर ड्रेनेज विभागातील 11 कर्मचार्‍यांनी देखील सह्या केल्या नव्हत्या. 

ज्या दिवशी या कर्मचार्‍यांनी सह्या केल्या नाहीत. त्या सर्व दिवसांचे पगार कपात करून त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्याचे आदेश आडके यांना दिले. तर हालचाल रजिस्ट्ररमधील नोंदी गेल्या अनेक दिवसांपासून लिहिल्या नसल्याचे देखील सभापतींना आढळून आले.