Tue, Apr 23, 2019 00:27होमपेज › Sangli › जिल्ह्यात 30 टक्के ऊस शिल्लक

जिल्ह्यात 30 टक्के ऊस शिल्लक

Published On: Mar 12 2018 1:07AM | Last Updated: Mar 11 2018 8:35PMसांगली : शशिकांत शिंदे 

साखर कारखान्यास गाळपास जाणारा   जिल्ह्यात अद्याप 25 ते 30 टक्के ऊस शिल्लक आहे. सध्या ऊस तोडणीसाठी बहुतेक कारखान्याच्या अनेक मजूर टोळ्या एकरी 25 हजार रुपयाची मागणी करीत आहेत. तर दुसर्‍याबाजूला वाढते तापमान आणि पाणी टंचाईमुळे  ऊस वाळण्याचा धोका निर्माण झाला आहे. शिल्लक उसाचे करायचे काय, असा प्रश्‍न शेतकर्‍यांसमोर आहे.

यंदा चांगला पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात उसाच्या लागणी होत आहेत. तर तोडणी मजूरांची संख्या कमी होऊ लागली आहे.  त्यामुळे मशिनने ऊस तोडणी करण्यासाठी शेतकर्‍यांनी पट्टा पद्धतीने ऊस लागण करावी, असे आवाहन कारखानदारांकडून करण्यात येत आहे. 

गेल्या काही वर्षात उसाला चांगला दर मिळाला. तसेच जिल्ह्याच्या पूर्वभागात पाणी योजनांचे  पाणी गेल्याने  उसाचे क्षेत्र वाढत आहे. एकदा ऊस लावल्यानंतर पुन्हा मजुरांकडून कष्टाची कामे नसतात. ऊस नोंद केल्यानंतर कारखाना तोडून घेऊन जातो. अशी स्थिती आतापर्यंत होती. मात्र आता कारखान्यांना तोडणी मजूरांचा प्रश्‍न भेडसावू लागला आहे.

ऊस तोडणी मजूरांची संख्या कमी होत असल्याने कारखान्यांनाही पुरेसा ऊस वेळवर मिळणे अवघड होत आहे. त्यामुळे वर्ष होऊन गेले तरी बहुतांशी ऊस शेतातच उभा आहे. त्यातच तापमानात झालेली वाढ, म्हैसाळ योजना बंद असल्याने झालेली पाणी टंचाई यामुळे शेतकर्‍यांसमोर पेच निर्माण झाला आहे. पुढील वर्षी नवीन पीक घेण्यासाठी शेत रिकामे करण्याचीही  धडपड सुरू आहे.  अनेक टोळ्यांचे मुकादम शेतकर्‍यांच्या अगतिकतेचा  फायदा घेत ऊस तोडणीसाठी एकरी 25 ते 30 हजार रुपयाची मागणी करीत आहेत. काही गावांत  शेतकर्‍यांना एकत्र येऊन ऊस स्वतःच तोडून कारखान्यास पाठवावा लागत आहे. पूर्वभाग तसेच दुष्काळी टापूत उसाचा एकरी उतारा 40 ते 50 मे. टन पडतो.  त्यामुळे तोडणीसाठी एवढे पैसे दिल्यानंतर सर्व खर्च वजा जाता शिल्लक काय राहणार, असा  प्रश्‍न त्यांच्यासमोर आहे. तरीसुद्धा ऊस लवकर घालविण्यासाठी तेवढे पैसे देऊनही मुकादमाच्या मागे त्यांचा तगादा सुरू आहे. 

आता बहुतेक साखर कारखान्यांनी  ऊस तोडणीसाठी सुद्धा मशीन्स् आणल्या आहेत. मात्र अनेक शेतकरी विशेषत: पूर्व भागातील शेतकरी पारंपारिक पद्धतीने ऊस लागण करीत आहेत. त्यामुळे मशीनने ऊस तोडण्यास मर्यादा येत आहेत.

आता तर भविष्यात मजूर टंचाई वाढतच जाणार आहे. ऊस तोडणी यंत्राला पर्याय राहणार नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी चार फुटी पट्टा पद्धतीनेच उसाची लागण करण्याची गरज आहे. ज्या शेतकर्‍यांनी पारंपारिक पद्धतीने लागण केली आहे. त्यांनी देखील आता एक सरी काढून पट्टा पद्धत करणे गरजेचे बनले आहे.  या पद्धतीमुळे उत्पादनात घट होते, असा समज शेतकर्‍यांत आहे. उलट भरपूर सूर्यप्रकाश, पाण्यात बचत होते. आंतरपीक घेता येते.