Thu, Jul 18, 2019 06:24होमपेज › Sangli › पीक कर्जावर ३० टक्के जादा कर्ज

पीक कर्जावर ३० टक्के जादा कर्ज

Published On: Jan 15 2018 1:44AM | Last Updated: Jan 14 2018 8:10PM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

सन 2018-19 च्या हंगामासाठी पीक कर्जावर 30 टक्के जादा कर्ज (कन्झम्प्शन कर्ज) उपलब्ध केले जाणार आहे. गरजू शेतकर्‍यांना त्याचा लाभ होईल. महिला बचत गट, ‘जेएलजी’ यांना जिल्हा बँकेमार्फत कर्ज वाटप केले जाते. आता विकास सोसायट्यांमार्फतही कर्ज वाटप होईल, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील यांनी दिली. 

जिल्हा बँकेत गुरूवारी कार्यकारी समिती सभा झाली. अध्यक्षस्थानी दिलीपराव पाटील होते. उपाध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, संचालक अनिलराव बाबर, विशाल पाटील, डॉ. सिकंदर जमादार, बी. के. पाटील, डॉ. प्रताप पाटील, महेंद्र लाड, उदयसिंह देशमुख, गणपती सगरे, चंद्रकांत हाक्के, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतापसिंह चव्हाण, सरव्यवस्थापक बी. एम. रामदूर्ग, मानसिंगराव पाटील उपस्थित होते. कार्यकारी समितीने बिगरशेती 54.66 कोटींच्या, तर शेती 8.67 कोटींच्या कर्जप्रकरणांना मंजुरी दिली.  शेती, बिगरशेती 63.33 कोटी रुपयांच्या कर्जप्रकरणांना मंजुरी दिली.

केंद्र शासन व नाबार्डच्या मार्गदर्शक सुचनेनुसार जिल्हा बँकेमार्फत किसान के्रडीट कार्ड योजनेंतर्गत शेतकर्‍यांना अल्पमुदत पीक कर्ज वाटप करण्यात येते. या योजनेंतर्गत पीक कर्जाव्यतिरिक्त शेतकर्‍यांना कन्झम्प्शन कर्ज पुरवठा करण्याबाबत नाबार्डने कळविले आहे. गरजु शेतकर्‍यांना पीक कर्जाव्यतिरिक्त जादा कर्ज (कन्झम्प्शन कर्ज) देण्याचे जिल्हा बँकेने निश्‍चित केले आहे. पीक कर्ज रकमेच्या 30 टक्के जादा कर्ज पुरवठा करण्यात येणार आहे. या कर्जाची मुदत ही त्या-त्या पिकाच्या देय तारखेपर्यंत किंवा कमाल 1 वर्षाकरिता राहणार आहे. या जादाच्या कर्जासाठी बँक विकास सोसायट्यांना 10.50 टक्के व्याज दराने, तर शेतकर्‍यांना 12.50 टक्के व्याजदाराने कर्ज
 मिळेल. 

विकास सोसायट्यांनाही आता बचत गट व जेएलजी ग्रुप स्थापन करता येईल. सोसायटीच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करता येईल. त्यासाठी जिल्हा बँक 2 टक्के व्याजाची तोशिस सहन करेल. बचत गट अथवा ‘जेएलजी’च्या व्याजदरात वाढ होणार नाही. बचत गट, जेएलजीना विनातारण कर्ज दिले जाते. प्रत्येक तालुक्यातील सक्षम 5 विकास सोसायटींमार्फत हा निर्णय प्रायोगिक तत्त्वावर तातडीने राबविला जाणार आहे.