Thu, Mar 21, 2019 11:06होमपेज › Sangli › 30 लाख लिटर दूध संकलन ठप्प

30 लाख लिटर दूध संकलन ठप्प

Published On: Jul 17 2018 1:36AM | Last Updated: Jul 16 2018 11:54PMसांगली ; प्रतिनिधी

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या दूध बंद आंदोलनास सांगली जिल्ह्यात  शेतकर्‍यांचा पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अनेक ठिकाणी शेतकर्‍यांनी दूध रस्त्यावर ओतून सरकारचा तीव्र निषेध केला. काही ठिकाणी देवतांना अभिषेक घातला. विद्यार्थी व गरिबांनाही दूध वाटण्यात आले. जिल्ह्यात  सुमारे 28 ते 30 लाख लिटर दुधाचे  संकलन  व कोट्यवधींची उलाढालही ठप्प झाली.   शिराळा, वाळवा, पलूस, कडेगाव, खानापूर, तासगाव, मिरज, आटपाडी, कवठेमहांकाळ, जत या तालुक्यांत  जोरदार आंदोलन झाले. दूध संघांच्या अप्रत्यक्ष पाठिंब्यामुळे दूध संकलन ठप्प झाले. विशेषत: पश्‍चिम भागात आंदोलन आक्रमकपणे झाले. पूर्व भागातही मोठा प्रतिसाद मिळाला. 

इस्लामपूर : शहर वार्ताहर

वाळवा तालुक्यात संकलन केंद्रे बंद असल्याने उत्पादकांनी दुधाचे वाटप केले. काही ठिकाणी दूध रस्त्यावर ओतून संताप व्यक्‍त केला. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी   प्रतिबंधात्मक  कारवाई  केली. आंदोलनामुळे तालुक्यातील 3 लाख लिटरपेक्षा जादा दूध संकलन ठप्प झाले.

राजारामबापू आणि  हुतात्मा संघाने   देखील दूध संकलन बंद ठेवले होते.  रेठरेधरण येथे उत्पादकांनी  रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध केला.   तुजारपूर येथे पेठ-सांगली रस्त्यावर   वाटसरू, वाहनचालकांना सुमारे 3 हजार लिटर दुधाचे वाटप केले. 

नवेखेड  परिसरातील शेतकरी व  स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी जमा झालेले दूध गरम करून झोपडपट्टी, शाळेतील विद्यार्थ्यांना वाटले. ऐतवडे खुर्द, ऐतवडे बुद्रूक, कुरळप, बोरगाव, नेर्ले आदी परिसरातही दूध संकलन केंद्रे बंद होती. 

नेर्ले/इटकरे : वार्ताहर

नेर्लेे, कासेगाव, पेठ परिसरात महामार्गावर मोठ्या पोलिस फौजफाट्यासह पोलिसांनी गस्त चालू ठेवली आहे. दिवसभरात महामार्गावरून एकही दुधाचा टँकर भरून मुंबईकडे रवाना झाला  नाही.   इटकरे येथे     शेतकर्‍यांनी   विद्यार्थ्यांना  दुधाचे वाटप केले.  

मिरज : प्रतिनिधी

मिरज तालुक्यात रोज दीड लाख लिटर दूधाचे संकलन होते. आंदोलनास  प्रतिसाद मिळाल्याने ते संकलन झाले शकले नाही.   पोलिसांनी  पश्‍चिम भागात तिघांना ताब्यात घेतले. ग्रामीण भागात शेतकर्‍यांनी काही ठिकाणी मोफत दुधाचे वाटप केले.