Tue, Apr 23, 2019 18:27होमपेज › Sangli › शिक्षकांच्या 268 बदल्या रद्द; फेरबदल्यांचे आदेश

शिक्षकांच्या 268 बदल्या रद्द; फेरबदल्यांचे आदेश

Published On: Jun 07 2018 2:08AM | Last Updated: Jun 06 2018 11:54PMसांगली : प्रतिनिधी

जिल्हा परिषदेकडील जिल्हांतर्गत बदली झालेल्या 2 हजार 166 शिक्षकांपैकी 268 शिक्षकांच्या बदल्या रद्द झाल्या आहेत. या शिक्षकांच्या फेरबदल्यांचा आदेश ग्रामविकास विभागाने बुधवारी जारी केला. दरम्यान 125 शिक्षकांची नव्याने बदली झाली आहे. विस्थापित 98 शिक्षकांची यादीही आली असून त्यातील 65 शिक्षकांना नव्याने पसंतीच्या शाळा भरून द्याव्या लागणार आहेत. 

जिल्हा परिषदेकडील 2 हजार 166 शिक्षक, मुख्याध्यापक, पात्र पदवीधर शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या दि. 28 मे रोजी झाल्या आहेत. मात्र राज्यस्तरावरून राबविलेल्या या बदली प्रक्रियेत अनेक त्रुटी राहिलेल्या आहेत. या त्रुटींच्या दुरुस्तीचे काम राज्यस्तरावर सुरू आहे. बुधवारी राज्यस्तरावरून 569 शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेला प्राप्त झाली आहे. नऊ दिवसांपूर्वी (दि. 28 मे 2018) झालेली बदली रद्द होऊन नव्याने बदलीचे ठिकाण मिळालेलेे 268 शिक्षक, नव्याने बदली झालेले 125 शिक्षक, नवे विस्थापित 98, ‘खो’ बसला असलेले अगर नसलेले 66 व काहीही बदल न झालेल्या 12 अशा एकूण 569 शिक्षकांची यादी  जिल्हा परिषदेला आली आहे. 

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमधील त्रुटी दुरुस्त करण्याचे काम राज्यस्तरावर सुरू आहे. त्यातून आणखी बदल्या होणार आहेत. बुधवारी 393 शिक्षकांच्या बदलीचा आदेश जिल्हा परिषदेला प्राप्त झाला आहे. मात्र समानीकरणासाठी रिक्त ठेवायच्या पदांवर झालेल्या बदल्यांमध्ये सुधारणा झाल्याचे दिसत नाही. समानीकरणाचा प्रश्‍न आणि तिढा जैसे थे राहिला आहे. जत, आटपाडी,कवठेमहांकाळ तालुक्यात शिक्षकांच्या रिक्त पदांचे प्रमाण जास्त आहे. त्यावर समानीकरणाचा पर्याय पुढे आला. मात्र दि. 28 मे रोजी झालेल्या बदल्या पाहता समानीकरणाचा प्रश्‍न सुटण्याऐवजी तो अधिकच गंभीर बनला. बुधवारी झालेल्या बदल्यांमध्येही काही मोजके अपवाद वगळता त्या-त्या तालुक्यातच बदल्या झालेल्या आहेत. वाळवा, मिरजेतून जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, तासगावला बदल्या झाल्या असत्या तर समानीकरणाचा प्रश्‍न सुटला असता. पण  तसे झालेले नाही. समानीकरण, तक्रारी, आक्षेपांच्या बदल्यांसाठी बदल्यांचा आणखी एक फेरा लवकरच येईल, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 

अनियमितता दूर न झाल्यास कायदेशीर मार्गाने लढा देणार : लाड

शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्यांमधील अनियमितता, त्रुटी दूर न झाल्यास कायदेशीर मार्गाने लढा दिला जाईल,असे प्राथमिक शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड यांनी सांगितले. यावेळी किरणराव गायकवाड, सयाजी पाटील, महादेव माळी, सुनील गुरव, शशिकांत बजबळे व समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.