होमपेज › Sangli › पोलिस अधीक्षकांनी केले एका दिवसांत २६६ तक्रारींचे निरसन

पोलिस अधीक्षकांनी केले एका दिवसांत २६६ तक्रारींचे निरसन

Published On: Dec 10 2017 1:21AM | Last Updated: Dec 09 2017 11:26PM

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

पोलिस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी कार्यभार घेतल्यानंतर कामाचा धडाका लावला आहे.  शनिवारी सुटीचा दिवस असूनही त्यांनी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रलंबित असलेले तक्रार अर्ज निकाली काढण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी, पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि तक्रारदारांची बैठक घेतली. यामध्ये त्यांनी आज एका दिवसात 266 तक्रारींचे निरसन करून अर्ज निकाली काढले. 

शर्मा यांनी झिरो पेन्डन्सीला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यांनी प्रथम उपअधीक्षक कार्यालय तसेच पोलिस ठाण्यात आलेले तक्रार अर्ज निकालात काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी आज सर्व उपअधीक्षक, पोलिस ठाण्यांचे प्रभारी अधिकारी आणि तक्रारदार यांची बैठक घेतली. यामध्ये तक्रारदारांशी प्रत्यक्ष चर्चा करून त्यावर संबंधित अधिकार्‍यांना तातडीने कारवाई करण्याचे आदेश त्यांनी दिले. 

या बैठकीत सांगली आणि मिरज उपविभागातील 111 तक्रार अर्ज निकाली काढण्यात आले. तर विटा कार्यालयाकडील 21, इस्लामपूरमधील 80, तासगावमधील 54 तक्रार अर्जांचा समावेश आहे. शर्मा यांनी कालच बेसिक पोलिसिंगवर भर देणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांनी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केल्याचे दिसून आले. पोलिस ठाण्यात झिरो पेन्डन्सीला महत्व देण्यात येणार असल्याचे त्यांनी कालच सांगितले होते. भविष्यात अशा बैठका उपविभागीय कार्यालय पातळीवर आयोजित करण्यात येणार आहेत.