होमपेज › Sangli › २५० कोटींचे ऊसबिल थकले

२५० कोटींचे ऊसबिल थकले

Published On: Feb 22 2018 1:23AM | Last Updated: Feb 21 2018 8:27PMसांगली : विवेक दाभोळे

जिल्ह्यातील गळीत हंगामाने आता चांगलीच गती घेतली आहे. जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये 60 लाख 75 हजार मे. टन उसाचे गाळप तर 69 लाख 73 हजार क्विंटल साखर पोत्यांचे उत्पादन झाले आहे. सरासरी साखर उतारा हा 11.88 टक्के राहिला आहे. दरम्यान, गळीत हंगामाची आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल सुरू झाली आहे. मात्र डिसेंबरमध्ये तुटून गेलेल्या उसाची बिले अजून देखील मिळालेली नसल्याने ऊसउत्पादकांची मात्र अभूतपूर्व आर्थिक कोंडी झाली आहे.  साधारणपणे डिसेंबरपासून  गाळप झालेल्या किमान दहा लाख मे. टन उसाचे प्रतिटन 2500 रू. प्रमाणे बिल धरले तरी जिल्ह्यातील ऊसउत्पादकांचे आजअखेर जवळपास 250 कोटी रुपयांचे बिल बहुसंख्य कारखान्यांकडे थकले असल्याचे स्पष्ट होते.   

गेल्या तीन आठवड्यापूर्वी जिल्ह्यांतील साखर कारखान्यांना सरासरी साखर उतारा हा 11.63 टक्के होता. मात्र, 20 फेबु्रवारी अखेर सरासरी साखर उतारा हा 11.88 इतका वाढला आहे. अर्थात साखर उतार्‍यात राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याच्या साखराळे युनिटने 12.44 टक्के साखर उतारा मिळवित आघाडीचे स्थान कायम राखले आहे.  गाळपात  देखील जवळपास 7 लाख 16 हजार मे. टन उसाचे गाळप करत गाळपात देखील आघाडी घेतली आहे. गळीत हंगाम आता अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना अनेक कारखान्यांना मात्र अपुर्‍या तोडणी यंत्रणेचा सामना करावा लागत आहे.

कोट्यवधींची बिले अडकली

गळीत हंगाम सुरू व्हायच्या वेळी कारखानदारांनी एफआरपी अधिक 200 रुपयांची मिळून पहिली उचल द्यायचा तोडगा मान्य केला होता. मात्र डिसेंबरमध्ये साखरेचा दर कमी झाल्याकडे बोट दाखवित कोल्हापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी 2500 रुपयांचीच पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला. लगेचच त्यापाठोपाठ सांगली जिल्ह्यातील  कारखानदारांनी देखील तातडीची बैठक घेत 2500 रुपयांचीच पहिली उचल देण्याचा निर्णय घेतला, अर्थात यामुळे ऊसउत्पादकांत मात्र नाराजीचा सूर आहे.

साधारणपणे डिसेंबरच्या दुसर्‍या आठवड्यापासून गाळप झालेल्या उसाची पहिली उचल अनेक कारखान्यांनी अजूनही दिलेली नाही. डिसेंबर ते आजअखेर साधारण जिल्ह्यात 10 लाख मे. टन गाळप उसाचे बिल थकित आहे. एफआरपी अधिक 200 राहू दे अगदी 2500 रुपयांची पहिली उचल जरी गृहित धरली तरी देखील हा थकित बिलाचा आकडा 250 कोटींच्या घरात जातो. ही कोट्यवधी रुपयांची थकित बिलाची रक्कम न मिळाल्याने ऊसउत्पादक शेतकर्‍यांची चांगली आर्थिक कोंडी झाली आहे. किमान आता तरी तातडीने 2500 रुपयांची पहिली उचल तातडीने ऊसउत्पादकांना अदा करण्याची मागणी होऊ लागली आहे.