Sat, Aug 24, 2019 21:58होमपेज › Sangli › गारपिटीने द्राक्षबागांचे 25 कोटींचे नुकसान

गारपिटीने द्राक्षबागांचे 25 कोटींचे नुकसान

Published On: May 18 2018 1:19AM | Last Updated: May 17 2018 10:28PMतासगाव : प्रतिनिधी

तालुक्यात बुधवारी रात्री वादळी वार्‍यासह झालेला पाऊस व गारपिटीने येळावी आणि परिसरातील गावांना अक्षरश झोडपून काढले. गारपीटीच्या तडाख्यात येळावी येथील 80 टक्के द्राक्षबागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. कृषि विभागाकडून नुकसानीचे पंचनामे  सुरू आहेत. द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांचे सुमारे 25 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी आर. बी. शिंदे यांनी दिली. 

शिंदे, मंडल कृषी अधिकारी आर. आर. खरमाटे, कृषी पर्यवेक्षक सचिन दाभोळे, कृषी सहाय्यक सी. के. पाटील, मंडल अधिकारी रमेश पवार,  तलाठी शशिकांत ओमासे यांचे पथक दिवसभर पंचनामे करीत होते.शिंदे म्हणाले, वादळी वारे आणि गारपीटीचा मोठा फटका येळावी येथील  द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांना बसला आहे. गावातील द्राक्षबागांच्या लागवडीखालील क्षेत्र सुमारे 250 हेक्टर आहे. त्यापैकी 200 हेक्टर क्षेत्रावरील द्राक्षबागांचे गारपिटीने नुकसान झाले आहे.  एक हेक्टर द्राक्षबागेचे सरासरी  उत्पन्न साडेबारा लाख रुपये असते.मात्र गारपीटीने  द्राक्षबागायतदार शेतकर्‍यांना सुमारे 25 कोटी रुपयांचा फटका बसणार आहे.

घरांचे पाच लाखांचे नुकसान 

येथे बुधवारी रात्री झालेल्या गारपिटीत आठ घरांचे नुकसान झाले. मंडल अधिकारी रमेश पवार आणि तलाठी शशिकांत ओमासे यांनी  नुकसानीचे पंचनामे केले, घरांचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले असल्याची माहिती नायब तहसीलदार सुनिल ढाले यांनी दिली आहे.

विमा निकष बदलासाठी मोर्चा... महेश खराडे

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महेश खराडे यांनी येळावी येथे  द्राक्षबागांच्या नुकसानीची पाहणी केली. ते म्हणाले, द्राक्ष पीक विमा योजनेचे निकष बदलण्याची गरज आहे. तरच शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळेल. सध्याचे निकष बदलून तात्काळ नुकसान भरपाई द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर लवकरच मोर्चा काढणार आहोत.