Fri, May 24, 2019 02:26होमपेज › Sangli › जत-विजापूर रस्त्यावर 24 लाखांचा दरोडा

जत-विजापूर रस्त्यावर 24 लाखांचा दरोडा

Published On: Mar 16 2018 1:21AM | Last Updated: Mar 16 2018 12:13AMजत : प्रतिनिधी

विजापूर-सातारा-गुहागर या राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी रात्री धूमस्टाईलने दरोडा घालण्यात आला. बेदाण्याने भरलेला टेम्पो, मोबाईल व रोकड असा 24 लाख 24 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. मोटारसायकलवरून आलेल्या दरोडेखोरांनी  टेम्पो  अडवून तलवारी व काठ्यांनी चालक, क्‍लीनर व अन्य एकास मारहाण केली. त्यांचे हातपाय बांधून दरोडेखोरांनी  पलायन केले. जत तालुक्यातील मुचंडी ते जत दरम्यान असलेल्या ढाब्यानजीक बुधवारी रात्री दरोड्याचा हा प्रकार घडला. 

यामध्ये चालक संगनबसू शरणाप्पा डोणूर (वय 32), महांतेश शिवाप्पा  खरकंबी (वय 30), सूर्यकांत धर्माण्णा नायकवडी (वय 35, सर्व रा. चलवादी, ता. सिंदगी, जि. विजापूर) हे तिघेजण जखमी झाले. याबाबत चालक डोणूर याने जत पोलिसांत तक्रार दिली आहे.

कर्नाटकातील चलवादी येथून टेम्पो ( केए-45 ए 3927) चार शेतकर्‍यांचे बेदाणे  घेऊन  जतमार्गे तासगावला कोल्ड स्टोअरेजकडे निघाला होता. टेम्पोत 810 बॉक्स बेदाणा होता. बाजारभावाप्रमाणे  त्याची  किंमत 17 लाख 10 हजार रूपये एवढी होते. रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास मुचंडी ते जत दरम्यान   सातजणांच्या टोळीने टेम्पो अडविला. तीन मोटारसायकलवरून ते आले होते. जर्कीन घातलेल्या व कापडाने तोंड बांधलेल्या दरोडेखोरांनी तलवारीचा धाक दाखवून टेम्पोमधील चालक, क्‍लिनर व अन्य एकास खाली उतरविले. 

तिघांनाही बेदम मारहाण करून त्यांच्याकडील तीन मोबाईल, रोख  1900 रूपये काढून घेतले. दोरीने हातपाय बांधून चालक, क्‍लीनर व शेतकरी या तिघांनाही रस्त्याकडेच्या खड्ड्यात टाकले.  मुद्देमालासह टेम्पो घेऊन विजापूरच्या दिशेने पलायन केले. जखमींनी आरडाओरडा करून आपली सुटका करून घेतली व पोलिस ठाण्याशी संपर्क साधला. पोलिसांनी रात्री टेम्पो व दरोडेखोरांचा शोध घेतला.