Wed, May 22, 2019 22:20होमपेज › Sangli › जिल्ह्यात 225 जणांना ‘नेत्रसंजीवनी’

जिल्ह्यात 225 जणांना ‘नेत्रसंजीवनी’

Published On: Sep 04 2018 1:19AM | Last Updated: Sep 03 2018 8:39PMसांगली : विवेक दाभोळे

सांगली जिल्ह्यात नेत्रदान चळवळीस बळ येऊ लागले आहे. गेल्या वर्ष दीड वर्षात 225 रुग्णांवर बुब्बुळ प्रत्यारोपण करुन त्यांना नेत्रसंजीवनी मिळाली आहे. अद्यापि जिल्ह्यात सहाशेहून अधिक रुग्ण बुब्बुळ प्रत्यारोपणाच्या प्रतीक्षा यादीवर आहेत.  

पद्मभूषण डॉ. वसंतरावदादा पाटील शासकीय रुग्णालयाच्यावतीने जिल्ह्यात नेत्रदान पंधरवडा राबविला जात आहे. यानिमित्ताने विविध उपक्रम राबविले जात आहेत. जगात सर्वश्रेेष्ठ मानल्या जात असलेल्या भारतीय संस्कृतीत दानाला अत्यंत महत्व आहे. समाजात अवयवदानाबाबत जागरुकता वाढत आहे. त्याचप्रमाणे मृत्यूनंतर देखील डोळ्यांच्या माध्यमातून आपण जिवंत राहू, या भावनेने नेत्रदान करण्यासाठी अनेकजण पुढाकार घेत आहेत.  

देशात नेत्रविकार तसेच अन्य कारणांमुळे दृष्टीहीन व्यक्तींची संख्या वाढत आहे. मात्र आता बुब्बुळ प्रत्यारोपण शस्त्रक्रिया करुन यावर मात करण्याचा प्रयत्न होतो आहे.  
सांगली जिल्ह्यात सन 2017-18 मध्ये जिल्ह्यात 401 जणांचे नेत्रदान झाले होते. तर 190 रुग्णांना बुब्बुळ प्रत्यारोपणाचा लाभ मिळाला होता. सन 2018 एप्रिलपासून आजअखेर जिल्ह्यात 70 जणांना नेत्रदान झाले आहे. तर  55 रुग्णांना बुब्बुळ प्रत्यारोपणाचा लाभ मिळाला आहे.  मात्र  अद्यापि जिल्ह्यात 600 रुग्ण बुब्बुळ प्रत्यारोपणासाठी प्रतीक्षा यादीवर आहेत.  

गैरसमजच अधिक  

कोणत्याही वयोगटातील व्यक्ती मरणोत्तर नेत्रदान करू शकते. नेत्रदानाचा  फॉर्म भरला नसेल तरीही नेत्रदान करता येते. मात्र व्यक्तीच्या निधनानंतर मृत्यूच्या चार ते सहा तासाच्या आत करावे लागते. याबाबत नजीकच्या नेत्रपेढीला सूचना दिल्यानंतर नेत्रतज्ज्ञ येऊन पारदर्शक पटल किंवा डोळा काढून घेतात. नेत्रदान करत असताना मृतदेहाला विद्रुपता येणार नाही याची मात्र आवर्जून दक्षता घेतली जाते. पण कर्करोग,  एड्स रुग्ण, कावीळ तसेच डोळ्यांना जंतूसंसर्ग झालेल्यांना नेत्रदान करता येत नाही.

समाज काय करू शकतो 

मृत्यूनंतरही जिवंत राहण्यासाठी नेत्रदान हा मार्ग आहे. नेत्रदान करण्याची इच्छा असल्यास नेत्रदानाचा फॉर्म भरावा. फॉर्म भरणे शक्य झाले नाही तरी जवळच्या नातेवाईकांना इच्छा सांगून ठेवावी म्हणजे मृत्यूनंतर ती पूर्ण करता येऊ शकते.  इच्छित व्यक्तीच्या मृत्यूनंतर तत्काळ नेत्रपेढीला संपर्क करावा. त्याचप्रमाणे नेत्रपेढीस कळवताना संपूर्ण नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक तसेच मृत्यूची वेळ कळवावी. दरम्यान, मृत व्यक्तीच्या डोळ्यावर थंड पाण्याची पट्टी ठेवावी.