Tue, Apr 23, 2019 22:39होमपेज › Sangli › कर्जमुक्त २० हजार शेतकर्‍यांना दोन दिवसात ‘मेसेज’

कर्जमुक्त २० हजार शेतकर्‍यांना दोन दिवसात ‘मेसेज’

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

सांगली : प्रतिनिधी

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत कर्जमाफीचे 72 कोटी रुपये जिल्हा बँकेने विकास सोसायट्यांच्या खात्याला वर्ग केले आहेत. विकास सोसायट्यांमधून संबंधित शेतकर्‍यांची कर्जखाती कर्जमुक्त करण्याची कार्यवाही मंगळवारी रात्री उशिरा पूर्ण होईल. 20 हजार शेतकर्‍यांना कर्जमुक्त झाल्याचे मेसेज त्यांच्या मोबाईलवर दोन दिवसात पोहोचतील, अशी माहिती जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था) प्रकाश अष्टेकर यांनी दिली. 

पहिल्या टप्प्यात जिल्हा बँकेकडील 1 हजार 346 शेतकर्‍यांना कर्जमाफीसाठी 6.52 कोटी रुपये आले. दुसर्‍या टप्प्यात 19 हजार 744 शेतकर्‍यांना थकीत कर्ज व पुनर्गठन केलेल्या कर्जाचे 72.19 कोटी रुपये जिल्हा बँकेच्या खात्यावर आले आहेत. दीड लाखांपर्यंत थकित कर्ज असलेले शेतकरी यामध्ये आहेत. संबंधित शेतकर्‍यांना कर्जमुक्त करण्यासाठी जिल्हा बँकेने विकास सोसायट्यांकडे रक्कम वर्ग केली आहे. सोसायट्यांकडून संबंधित शेतकर्‍यांची कर्जखाती निल करण्याची कार्यवाही रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

नियमित कर्ज फेडलेल्या 21 हजार 85 शेतकर्‍यांना 36.39 कोटी रुपयांचे प्रोत्साहन अनुदान मिळणार आहे. ही रक्कम थेट संबंधित शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणार आहे. कर्जमाफीचा लाभ मिळालेल्या शेतकर्‍यांना त्याची माहिती त्यांच्या मोबाईलवर दोन दिवसात मेसेजद्वारे पाठविली जाणार आहे. प्रोत्साहन अनुदानाची रक्कमही खात्यावर जमा झाल्यानंतर संबंधित शेतकर्‍यांना मेसेजद्वारे माहिती कळविली जाणार असल्याचे सांगण्यात आले.