Thu, Apr 25, 2019 04:10होमपेज › Sangli › हिंदकेसरींच्या स्मारकासाठी २ कोटी मंजूर

हिंदकेसरींच्या स्मारकासाठी २ कोटी मंजूर

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

इस्लामपूर : प्रतिनिधी

सांगली जिल्ह्यातील कवठेपिरान येथील हिंदकेसरी स्व. मारुती माने यांच्या स्मारकाच्या उर्वरित कामासाठी  क्रीडा विभागाने  2 कोटी 4 लाखाचा निधी मंजूर केला  आहे. स्मारकाच्या रेंगाळलेल्या कामास आता गती देऊ, असे आमदार जयंत पाटील यांनी सांगितले.

हा निधी मिळवण्यासाठी स्मारक समितीचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी सातत्याने अर्थ विभागाकडे पाठपुरावा केला होता. आता या निधीतून स्व. भाऊंच्या स्मारकाच्या कामास गती देता येणार असल्याने कवठेपिरान गाव व कुस्ती प्रेमींमध्ये समाधानाची प्रतिक्रिया  आहे.

आघाडी शासनाने माने यांच्या जन्मगावी स्मारक बांधण्याचा निर्णय घेऊन काम सुरू केले होते. जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली स्मारक समिती स्थापन करण्यात आली होती. या समितीचे तत्कालीन मंत्री ( स्व.) डॉ. पतंगराव कदम उपाध्यक्ष आणि जिल्हाधिकारी सचिव होते. जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, माजी जि.प.सदस्य भीमराव माने, शिवछत्रपती पुरस्कार विजेते नजरुद्दीन नायकवडी या समितीचे सदस्य होते. 

आघाडी शासन काळात या स्मारकाचे बरेच काम पूर्ण झाले. हे स्मारक कोणत्या जागेत बांधायचे,  हा निर्णय करणे व ती जागा मिळविण्यात प्रारंभीचा काही काळ गेला होता. मध्यंतरी राज्य शासनाकडून पुरेसा निधी मिळू न शकल्यामुळे हे काम थांबले होते. आमदार पाटील यांनी नागपूर अधिवेशनात स्मारकाच्या निधीसाठी आवाज उठविला होता. तसेच अर्थविभागाकडून हा निधी वितरित करण्यास क्रीडा विभागास परवानगी मिळावी यासाठी सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यामुळे स्मारकासाठी राज्य शासनाच्या  क्रीडा विभागाकडून हा निधी दिला.

जयंत पाटील म्हणाले, हिंदकेसरी मारुती माने  हे राज्यातील, देशातील कुस्तीची शान आहेत. त्यांचे स्मारक तातडीने पूर्ण करणे ही सर्वांची जबादारी व कर्तव्य आहे. निधीअभावी  स्मारकाचे काम थांबणे चुकीचे आहे. आता काहीसा उशिरा का होईना निधी मिळाला आहे. 

 

Tags : Islampur, Islampur news, Hindakesari Maruti Mane, memorial, Funds, 


  •