Mon, Nov 19, 2018 16:47



होमपेज › Sangli › सांगलीत तोडफोडप्रकरणी दोघांना अटक

सांगलीत तोडफोडप्रकरणी दोघांना अटक

Published On: Jan 07 2018 10:51AM | Last Updated: Jan 07 2018 10:51AM

बुकमार्क करा




सांगली ः प्रतिनिधी

भीमा-कोरेगाव, वढू येथे घडलेल्या घटनांचे पडसाद सांगली जिल्ह्यातही उमटले. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात अनेक ठिकाणी तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. याप्रकऱणी सांगली शहर पोलिसांनी शनिवारी पहाटे दोघांना अटक केली. याप्रकरणी जिल्हाभरात 18 गुन्हे दाखल केले आहेत. यामध्ये शासकीय आणि खासगी मालमत्तांचे 15 लाखांचे नुकसान झाल्याचे सुत्रांनी सांगितले. 

पिल्या कांबळे ऊर्फ पंचशील भोपाल जयकर (वय 21), वामदेव कांबळे उर्फ युगंधर यशोदत्त कुरणे (वय 23, दोघेही रा. सिद्धार्थ परिसर, गावभाग) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. भीमा-कोरेगाव, वढू येथील घटनांचे जिल्हाभरात पडसाद उमटले. विविध ठिकाणी एस.टी. बस, ट्रक पेटविण्यात आले. खासगी ट्रॅव्हल्स, चारचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्याशिवाय बुधवारी पुकारलेल्या बंदवेळी पंचवीसहून अधिक दुकानेही फोडण्यात आली. मारूती चौकातील फलकही फाडण्यात आला होता. 

बुधवारी रात्री उशिरापासून व्हिडिओ चित्रण, प्रत्यक्ष साक्षीदार, खबर्‍यांकडून माहिती घेऊन गुन्हे दाखल करण्यास प्रारंभ केला. गुरुवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यांत 18 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  

याप्रकऱणी सांगली शहर पोलिस ठाण्यात तीन, विश्रामबाग ठाण्यात दोन, सांगली ग्रामीण ठाण्यात एक, महात्मा गांधी चौक ठाण्यात चार, मिरज ग्रामीणमध्ये तीन, आष्टामध्ये दोन, जत पोलिस ठाण्यात दोन असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील जतमधील दोन व विश्रामबागमधील एक गुन्हा अदखलपात्र आहे. यातील अन्य संशयितांना लवकरच अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले.