Sat, Feb 16, 2019 04:38होमपेज › Sangli › कृषिपंप जोडणीसाठी 187 कोटींच्या निविदा

कृषिपंप जोडणीसाठी 187 कोटींच्या निविदा

Published On: Jul 07 2018 1:37AM | Last Updated: Jul 06 2018 7:58PMसांगली : प्रतिनिधी

कृषीपंपाचे कनेक्शन आता उच्चदाब वीज वितरण प्रमाणीद्वारेच दिले जाणार आहे. याची निविदा प्रक्रिया देखील सुरू झाली आहे. कोल्हापूरसाठी 75 व सांगलीसाठी 187.95 कोटींच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. प्रचलित पध्दतीनुसार शेतीला 63 व 100 केव्हीए क्षमतेच्या रोहित्रावरुन वीजपुरवठा होतो. एका रोहित्रावर 15 ते 20 शेतीपंपांना वीजपुरवठा केला जात असल्याने कमी दाबाने पुरवठा होणे, बिघाड होऊन पुरवठा खंडित होणे, रोहित्र जळणे तसेच तांत्रिक गळती वाढणे अशा समस्यांना तोंड द्यावे लागते. यावर उपाय म्हणून उच्चदाब वितरण प्रणाली राबविण्याचे धोरण आखले आहे. 

या प्रणालीमध्ये शेतकर्‍यांच्या विहिरीपर्यंत उच्चदाबाची (11 केव्ही) वाहिनी उभारुन वीज जोडणी दिली जाणार आहे. 7.5 अश्‍वशक्ती जोडभारासाठी 10 केव्हीएचे, 10 अश्‍वशक्तीसाठी 16 तर त्याहून अधिक भार किंवा शेजारी दुसरे शेतकरी असल्यास 25 केव्हीए क्षमतेचे थ्री फेज रोहित्र खांबावरच बसविले जाणार आहे. त्याच खांबावर रोहित्राच्या खाली मीटर पेटी बसवून जोडणी दिली जाणार आहे. एका रोहित्रावर फक्त एक किंवा दोन कृषीपंप असणार आहेत.  कोल्हापूर जिल्ह्यात 5491 शेतकरी कृषीपंपाच्या जोडणीसाठी प्रतीक्षेत आहेत. त्यांच्यासाठी या  प्रणालीअंतर्गत 75 कोटी 21 लाखांच्या निविदा मागविण्यात आल्या आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातील 13487 प्रलंबित कृषीपंप जोडणीसाठी 187.95 कोटीच्या निविदा मागविल्या आहेत.