Thu, Jun 27, 2019 17:54होमपेज › Sangli › तोडफोडप्रकरणी 18 गुन्हे दाखल

तोडफोडप्रकरणी 18 गुन्हे दाखल

Published On: Jan 05 2018 1:25AM | Last Updated: Jan 05 2018 12:21AM

बुकमार्क करा
सांगली : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव, वढू येथे घडलेल्या घटनांचे पडसाद सांगली जिल्ह्यातही उमटले. गेल्या तीन दिवसांत जिल्ह्यात अनेक ठिकाणी तोडफोड, जाळपोळ करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी जिल्हाभरात 18 गुन्हे दाखल केले आहेत. त्यातील तीन गुन्हे अदखलपात्र आहेत. यामध्ये शासकीय आणि खासगी मालमत्तांचे 15 लाखांचे नुकसान झाल्याचे सूत्रांनी सांगितले. 

भीमा कोरेगाव, वढू येथील घटनांचे जिल्हाभरात पडसाद उमटले. जत येथे एसटी बस, ट्रक पेटविण्यात आले. मिरजेत शहरी बसेसची तोडफोड करण्यात आली. सांगलीत खासगी ट्रॅव्हल्स, चारचाकी गाड्यांची तोडफोड करण्यात आली. त्याशिवाय बुधवारी पुकारलेल्या बंदवेळी पंचवीसहून अधिक दुकानेही फोडण्यात आली. मारुती चौकातील फलकही फाडण्यात आला होता. याप्रकरणी बुधवारी पोलिसांनी संयमाची भूमिका घेत तातडीने कारवाई करण्याचे टाळले होते. 

मात्र, बुधवारी रात्री उशिरापासून व्हिडीओ चित्रण, प्रत्यक्ष साक्षीदार, खबर्‍यांकडून माहिती घेऊन गुन्हे दाखल करण्यास प्रारंभ केला. गुरुवारी रात्रीपर्यंत जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यांत 21 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील तीन गुन्हे अदखलपात्र आहेत. यामध्ये शासकीय आणि खासगी मालमत्तांचे 15 लाखांचे नुकसान झाले आहे.  याप्रकरणी सांगली शहर पोलिस ठाण्यात तीन, विश्रामबाग ठाण्यात दोन, सांगली ग्रामीण ठाण्यात एक, महात्मा गांधी चौक ठाण्यात चार, मिरज ग्रामीणमध्ये तीन, आष्टामध्ये दोन, जत पोलिस ठाण्यात दोन असे गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यातील जतमधील दोन व विश्रामबागमधील एक गुन्हा अदखलपात्र आहे. या घटनांमध्ये एकजण जखमी झाला आहे. गेल्या तीन दिवसांत झालेल्या तोडफोडीत शासकीय मालमत्तेचे 7 लाख 66 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. तर खासगी मालमत्तेचे 6 लाख 70 हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. 

सध्या याप्रकरणी अज्ञातांवर गुन्हे दाखल करण्यात आले असले तरी विविध पुराव्यांच्या आधारे संशयितांची नावे निष्पन्न करण्याचे काम सुरू आहे. नावे निष्पन्न झाल्यानंतर पुढील कारवाई करू असे अतिरिक्त पोलिस अधीक्षक शशिकांत बोराटे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.