Fri, Apr 26, 2019 17:19होमपेज › Sangli › शहरातील 164 मतदानकेंद्रे संवेदनशील

शहरातील 164 मतदानकेंद्रे संवेदनशील

Published On: Jul 26 2018 1:39AM | Last Updated: Jul 26 2018 1:39AMसांगली : प्रतिनिधी

पोलिसांकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार  शहरातील 544 मतदान केंद्रापैकी 164 मतदान केंद्रे संवेदनशील असल्याचे निवडणूक अधिकारी तथा आयुक्त रविंद्र खेबुडकर यांनी पत्रकार बैठकीत स्पष्ट केले. महापालिका निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी दि.1 ऑगस्टरोजी होणार्‍या मतदान आणि दि. 3 ऑगस्टरोजी होणार्‍या मतमोजणीसाठी प्रशासकीय तयारी पूर्ण झाल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी उपायुक्त सुनील पवार, स्मृती पाटील उपस्थित होते.

खेबुडकर म्हणाले,  महापालिका निवडणुकीची रणधुमाळी आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. सर्वपक्षीयांकडून प्रचाराचा धडका सुरू आहे. परंतु राज्य निवडणूक आयोगाच्या आदेशाने आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी सुरू आहे. यानुसार अनेकांवर गुन्हेही दाखल करण्यात आले आहेत. हे करीत असतानाच महापालिकेने निवडणुकीचे मतदान आणि मतमोजणीची तयारीही पूर्ण केली आहे. यासाठी मनुष्यबळही सज्ज ठेवले आहे.

ते म्हणाले, महापालिका क्षेत्रात मतदानासाठी एकूण 544 मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार त्यांची उभारणी करण्यात आली आहे. परंतु सर्व प्रभागातील 164 मतदान केंद्र संवेदनशील असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला आहे. त्यानुसार पोलिस यंत्रणाही सज्ज आहे. खेबुडकर म्हणाले, मतदारांना त्यांची नावे असलेल्या चिठ्ठ्यां (स्लीप)ची छपाई करण्यात आली आहे. त्या उद्यापासून 154 कर्मचार्‍यांच्या माध्यमातून त्या मतदारांपर्यंत पोहोचवल्या जातील. त्या चिठ्ठीवर फोटोसह सविस्तर माहिती देण्यात आली आहे. तसेच सर्व मतदान यंत्रेही राजयकीय पक्षांच्या उपस्थितीत तपासून सील करण्यात आली आहेत.

शहरात 27 भरारी पथके 

ते म्हणाले, मतदानासाठी आता आठवड्याचा अवधी राहिलेला आहे. त्यानुसार मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे  कोणताही अनुचित प्रकार घडू नये. तसेच अवैध धंदे, गैरपकार रोखण्यासाठी 27 भरारी पथके तैनात करण्यात आले आहेत. तसेच तपासणी नाक्यांचीही संख्या वाढविण्यात आली आहे. खेबुडकर म्हणाले, आजपर्यंत 27 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आचरसंहितेच्या पालनासाठी चोवीस तास पथके सतर्क राहतील. हॉटेल, ढाब्यांवरही वेळेचे बंधन न पाळल्याबद्दल कारवाई मोहीम सुरू ठेवली आहे. 

मतमोजणीसाठी अकरा फेर्‍या 

ते म्हणाले, मतमोजणीसाठी मिरजेतील शासकीय गोदामात सोय करण्यात आली आहे. दि. 3 ऑगस्टरोजी सकाळी दहा वाजता मतदमोजणीला सुरवात होईल. सांगली-कुपवाड व मिरजेतील प्रभागासाठी सर्वत्र व्यवस्था करण्यात आली आहे. मोतमोजणीसाठी अकरा फेर्‍या होतील. तिसर्‍या फेरीत प्रभाग 12, 9, 15, 1, 6, 3, पाचव्या फेरीत 13 आणि 7, सहाव्या फेरीत 10, 17, 2, तर सातव्या फेरीत प्रभाग 19 ची मतमोजणी होईल. नवव्या फेरीत 20 आणि 5, आणि अकराव्या फेरीत प्रभाग 16 ची मतमोजणी होईल. दुपारी तीन वाजेपर्यंत निकाल स्पष्ट होईल. 

आदर्श मतदान केंद्र 

उपायुक्त स्मृती पाटील म्हणाल्या, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व मतदान केंद्र आदर्श करण्यावर भर आहे. तेथे सर्व सुविधा, प्रसन्न वातावरण, स्वच्छतागृहांची व्यवस्था असेल. त्यासाठी शाळा मुख्याध्यापकांची बैठक घेण्यात आली आहे. सर्वच मतदान केंद्र आदर्श होतील.