Thu, Jul 18, 2019 04:06होमपेज › Sangli › व्याज परताव्याचे 16.39 कोटी केंद्राकडे अडकले 

व्याज परताव्याचे 16.39 कोटी केंद्राकडे अडकले 

Published On: Jul 04 2018 2:19AM | Last Updated: Jul 03 2018 11:32PMसांगली : प्रतिनिधी

पीक कर्ज वेळेत परतफेड केलेल्या शेतकर्‍यांच्या रिबेटचे (व्याज सवलत) 16 कोटी 39 लाख 70 हजार रुपये केंद्र शासनाकडे अडकले आहेत. 1 लाख 24 हजार 808 शेतकर्‍यांची सन 2015-16 व सन 2016-17 मधील ही रक्कम आहे. केंद्राने ही रक्कम तातडीने शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा करणे आवश्यक आहे. 

शेतकर्‍यांना पीक कर्ज 6 टक्के व्याज दराने मिळते. मात्र नियमित कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळते. त्यासाठी केंद्र व राज्य शासन व्याज सवलत योजना राबविते. वेळेत कर्जफेड करणार्‍या शेतकर्‍यांना केंद्र शासन 3 लाखांपर्यंतच्या कर्जाला 3 टक्के व्याज परतावा देते. तर डॉ. पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून राज्य शासन 1 लाखांपर्यंतच्या कर्जाला 3 टक्के, तर 1 लाखावर ते 3 लाखांपर्यंतच्या कर्जाला 1 टक्का व्याज सवलत मिळते. वेळेत कर्ज फेडल्यास 1 लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्क्याने तर 1 लाखावर ते 3 लाखांपर्यंतचे कर्ज 2 टक्के व्याज दराने मिळते. 

शेतकर्‍यांनी वेळेत कर्जपुरवठा करावा यासाठी प्रोत्साहन म्हणून केंद्र व राज्य शासन व्याज सवलतीची रक्कम शेतकर्‍यांना देते. सन 2015-16 व सन 2016-17 च्या रिबेटची राज्य शासनाची 3 टक्के व 1 टक्के व्याज सवलतीची रक्कम शेतकर्‍यांच्या खात्यावार जमा झालेली आहे. मात्र केंद्र शासनाची 3 टक्के व्याज सवलतीची सन 2015-16 व सन 2016-17 ची रक्कम अद्याप शेतकर्‍यांना मिळालेली नाही. सन 2015-16 ची रक्कम मार्च 2018 मध्ये शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा होणे आवश्यक होते. तर सन 2016-17 ची रक्कम सप्टेंबर 2018 मध्ये शेतकर्‍यांच्या खात्यावर वर्ग होणे गरजेचे होते. मात्र अद्याप ही रक्कम शेतकर्‍यांना मिळालेली नाही. केंद्र शासनाने ही रक्कम तातडीने देणे आवश्यक आहे. 

शासनाचे लक्ष वेधणार : दिलीपराव पाटील

जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील म्हणाले, पीक कर्ज घेऊन वेळेत परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना प्रोत्साहन म्हणून केंद्र व राज्य शासन 6 टक्के व्याज परतावा देते. ही रक्कम शेतकर्‍यांना वेळच्यावेळी मिळणे गरजेचे आहे. व्याज परताव्याची थकित रक्कम मिळण्यासाठी शासनाचे लक्ष वेधणार आहोत.