सांगली : प्रतिनिधी
शिक्षकांच्या 153 बदल्यांची व विस्थापित 22 शिक्षकांची तिसरी यादी मंगळवारी ‘ग्रामविकास’कडून जिल्हा परिषदेला प्राप्त झाली आहे. वाळवा, मिरज तालुक्यातील 72 शिक्षकांची तालुक्याबाहेर बदली झाली आहे. अजुनही 48 शाळा ‘शून्य शिक्षकी’ राहिल्या आहेत. दरम्यान बदल्यांमधील त्रुटी दूर करून न्याय मिळावा यासाठी जिल्ह्यातील 130 शिक्षकांची याचिका बुधवारी उच्च न्यायालयात दाखल होत आहे.
जिल्हा परिषदेकडील 2 हजार 444 शिक्षकांच्या बदल्या तीन टप्प्यात झाल्या आहेत. पहिल्या टप्प्यातील बदलीने जिल्ह्यात 86 शाळा ‘शून्य शिक्षकी’ झाल्या होत्या. दुसर्या टप्प्यानंतर ही संख्या 79 पर्यंत व आता तिसर्या टप्प्यानंतर ही संख्या 48 पर्यंत खाली आली आहे. चौथ्या टप्प्यात ही संख्या शून्यावर आणण्याचे प्रयत्न शासनाचे राहतील व जिल्ह्यात एकही शाळा शून्य शिक्षकी राहणार नाही, असे संकेत आहेत.
शिक्षक संघटना एकत्र
शिक्षक समिती, शिक्षक संघ, शिक्षक भारती, पदवीधर शिक्षक संघटनेने एकत्र येऊन शिक्षक संघटना समन्वय समिती स्थापन केली आहे. बदलीतील त्रुटी दूर करून न्याय मिळावा यासाठी 130 शिक्षकांतर्फे समन्वय समिती बुधवारी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार आहे.
सीनिअर शिक्षकाच्या पसंतीची शाळा ज्युनिअर शिक्षकाला मिळणे, पती-पत्नी एकत्रिकरणाऐवजी ते विस्थापित होणे, भाषेच्या शिक्षकाला समाजशास्त्रच्या शिक्षकाने खो देणे, बदली पोर्टल स्लो असल्याने माहिती भरण्यास वेळ न मिळणे व त्यामुळे विस्थापित होणे आदी काही त्रुटींमुळे जिल्हांतर्गत बदलीमध्ये अन्याय झाल्याची भावना या 130 शिक्षकांमध्ये आहे. शिक्षक संघटना समन्वय समितीचे समन्वयक व समितीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब लाड, शिक्षक संघ (थोरात गट) जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, शिक्षक संघ (पाटील गट) अध्यक्ष मुकूंद सूर्यवंशी, शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष महेश शरणाथे, पदवीधर संघटनेचे तुकाराम सावंत हे याचिका दाखल करण्यासाठी मुंबईला गेले आहेत.
समानीकरणासाठी रँडम राऊंड आज की उद्या
शिक्षक बदल्यांचे तीन टप्पे झाले तरी तालुकानिहाय शिक्षकांच्या रिक्त पदांच्या समानीकरणाचा प्रश्न जैसे थे राहिला आहे. उलट जत तालुक्यात या बदल्यांमुळे रिक्त पदांची संख्या वाढली आहे. समानीकरणासाठी जत तालुक्यात रिक्त पदे 85 आवश्यक आहेत. सध्या 139 पदे रिक्त आहेत. तिसर्या टप्प्यात अन्य तालुक्यातून केवळ 7 शिक्षक जत तालुक्यात आले आहेत. आटपाडी, कवठेमहांकाळ तालुक्यातही समानीकरण झालेले नाही. दरम्यान, समानीकरणासाठी बदल्यांचा चौथा टप्पा (रँडम राऊंड) बुधवारी अथवा गुरूवारी होऊ शकतो, असे संकेत मिळत आहेत.