Wed, Jan 23, 2019 00:38होमपेज › Sangli › बक्षिसाच्या आमिषाने सव्वा कोटींची फसवणूक

बक्षिसाच्या आमिषाने सव्वा कोटींची फसवणूक

Published On: Aug 28 2018 1:44AM | Last Updated: Aug 27 2018 11:48PMतासगाव : शहर प्रतिनिधी

शहरात काही दिवसांपूर्वी सुरू करण्यात आलेल्या लातूरच्या एका कंपनीकडून तालुक्यातील 150 जणांना बक्षिसाच्या आमिषाने प्रत्येकी आठ हजार असा सव्वा कोटी रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी तासगाव पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

तासगाव पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे, लातूर येथील एका कंपनी तासगाव दत्तमाळ परिसरात काही महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. या कंपनीतर्फे काही मुले व मुली मार्केटिंगसाठी निवडण्यात आली होती. मार्केटिंग करणारे हे तरुण व तरुणी कंपनीचे कार्ड व पत्रिका दाखवत. यामध्ये सभासदाने 499 चा हप्ता दर आठवड्याला भरल्यास हमखास बक्षीस लागेल, अशी योजना होती. मात्र हप्ता चुकल्यास बक्षिसाची रक्कम मिळणार नाही, अशी अट घालण्यात आली होती.

एप्रिल महिन्यात ही योजना सुरू करण्यात आली. अनेक आमिषे दाखवून लोकांना या जाळ्यात ओढले गेले. बक्षिसाच्या आमिषाने लोक हप्ते भरत होते. तासगाव येथेे या कंपनीच्यावतीने फायदे काय, हे सांगण्यासाठी मार्गदर्शन शिबिरही आयोजित करण्यात आले होते.  त्यावेळी ‘हप्ता चुकवू नका, बक्षीस गमवू नका’ हे ब्रीदवाक्य सांगण्यात आले होते.

सोमवारी याच कार्यालयात लकी ड्रॉची सोडत होती. यासाठी सकाळी आठ वाजल्यापासून लोकांनी याठिकाणी गर्दी केली होती. मात्र संबंधित कंपनीचे कोणीच त्याठिकाणी आले नाही. अनेकांनी पत्रिकेवरील मोबाईलवर संपर्क केला असता फोन बंद असल्याचे आढळले. यावरुन अखेर आपली फसवणूक झाल्याचे लोकांच्या लक्षात आले. 

दरम्यान या प्रकाराने हादरलेल्या सर्व सभासदांनी तासगाव पोलिसात धाव घेत तक्रार दिली आहे. दिडशेहून अधिक लोकांची सव्वा कोटीहून अधिक रक्कमेची फसवणूक झाली असल्याचे तक्रारी अर्जात म्हटले आहे, अधिक तपास पोलिस करीत आहेत.