Wed, Jul 24, 2019 12:14होमपेज › Sangli › माजी नगरसेवक पुत्रासह 15 जणांवर गुन्हा

माजी नगरसेवक पुत्रासह 15 जणांवर गुन्हा

Published On: Jun 01 2018 2:13AM | Last Updated: Jun 01 2018 12:04AMसांगली : प्रतिनिधी

कर्नाळ  येथील  पवन संजय मोहिते (वय 21) या तरुणांवर तलवारीने खुनी हल्ला केल्याप्रकरणी आज माजी नगरसेवक धनंजय सूर्यवंशी यांचे पुत्र ऋतुराज व हृषीकेश सूर्यवंशी यांच्यासह पंधरा जणांविरोधात सांगली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे . रविवारी   रात्री कर्नाळ रस्त्यावरील शिवशंभो चौकात हा हल्ला करण्यात आला होता.   संशयितांनी  पवन बेशुद्ध पडल्यानंतर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करून पलायन केले होते.  दरम्यान, पोलिसांनी या प्रकरणी दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. 

पवन येथील शिवशंभो चौकातून भेळ खाऊन गावी कर्नाळला जात  होता. त्यावेळी  सूर्यवंशी बंधूसह मनोज फार्णे, अमित उर्फ पप्पू फार्णे, अजय फार्णे, शिवतेज सावंत, विनायक सावंत असे सातजण व अनोळखी आठजणांनी पवनवर तलवारीसह काठी, दगडाने हल्ला केला.   त्यात पवन जागेवरच बेशुद्ध पडला. त्यानंतर   त्याला सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. कुटुंबीय रात्री उशिरापर्यंत शोधत सिव्हिलमध्ये आले असता पवन बेशुद्धावस्थेत रुग्णालयात आढळला. तो शुद्धीत आल्यानंतर झालेला प्रकार उघडकीस आला. तक्रार केली असता पोलिसांनी आरोपींच्या नावाबाबत रुग्णालयातील तसेच शहरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे चौकशी केली आणि  गुन्हा दाखल केला.  कर्नाळ येथील एका महाविद्यालयीन युवतीची छेडछाड पटेल चौकातील टोळक्याने काढली. त्याचा जाब कर्नाळमधील काही तरुणांनी विचारला होता.  त्याचा राग धरून काही  तरुणांनी कर्नाळमधील त्या युवतीच्या घरावर हल्ला केला. 

घराच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. बुलेटचे नुकसान केले. त्यानंतर ते सांगलीला परतत असताना पवन वाटेत शिवशंभो चौकात दिसला. पवन कर्नाळमधील तरुणांसोबत असतो याचा राग धरून त्यांनी त्यालाही बेदम चोपले. कर्नाळमधील हल्ल्याप्रकरणी सूर्यवंशी बंधूवर स्वतंत्रपणे ग्रामीण पोलिस ठाण्यात तसेच छेडछाड प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. उपनिरीक्षक रोहित चौधरी तपास करत आहेत. 

सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शहानिशा करुन गुन्हा

कर्नाळ येथे तलवारी, दगड आणि काठीच्या सह्याय्याने मारहाण झाल्यानंतर  पवनला सिव्हिल रुग्णालयात दाखल केले. या सर्व प्रकाराची सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे खात्री करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी संबंधितांच्यावर गुन्हे दाखल केले आहे.