Mon, Jun 24, 2019 21:03होमपेज › Sangli › अखेर म्हैसाळ योजनेला 15 कोटी मिळाले

अखेर म्हैसाळ योजनेला 15 कोटी मिळाले

Published On: Mar 24 2018 1:54AM | Last Updated: Mar 23 2018 11:43PMसांगली : प्रतिनिधी

म्हैसाळ पाणी योजनेच्या थकीत वीज बिलासाठी अखेर पंधरा कोटी रुपये शुक्रवारी पाटबंधारे विभागाला मिळाले. ते आजच महावितरण कंपनीकडे वर्ग केले. त्यामुळे म्हैसाळ योजनेचे 80 टक्के पंप शनिवारपासून सुरू होणार आहेत, ही माहिती  पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता हणमंत गुणाले यांनी पत्रकार परिषदेत दिली. 

म्हैसाळ योजनेचे पाणी मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव, जत आणि सांगोला तालुक्यात जाते. या योजनेसाठी वापरलेल्या विजेचे बिल 34 कोटी रुपये थकीत होते. ही रक्कम  भरल्याशिवाय पाणी सुरू न करण्याची भूमिका पाटबंधारे विभागाने घेतली. वाढत्या उन्हामुळे पिके वाळण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे पाणी  योजना सुरू करा, या मागणीसाठी शेतकरी रस्त्यावर उतरले. 

त्यात विशेषतः काँग्रेस- राष्ट्रवादीच्या नेते, कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला.  त्या पार्श्‍वभूमीवर ही थकीत रक्कम टंचाईतून भरली जावी, यासाठी खासदार संजय पाटील यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र   टंचाई निधीतून पैसे देण्यास काहींनी विरोध केला. त्यामुळे हा निधी मिळणार की नाही, याबाबत प्रश्‍न निर्माण झाला होता. खासदार पाटील आणि आमदार खाडे यांनी आक्रमक भूमिका घेतल्याने हा निधी अखेर मिळाला. महामंडळाकडून 15 कोटी रुपये आज पाटबंधारे विभागाकडे वर्ग झाले. त्यानंतर एका तासातच हे पैसे महावितरणकडे वर्ग करण्यात आले. 

त्याशिवाय पाटबंधारे विभागाने शेतकर्‍यांकडून गोळा केलेले 5 कोटी रुपये आधी महावितरणला भरले आहेत. त्यामुळे उद्यापासून आता  पाणी सुरू होणार आहे. वेगवेगळ्या टप्यातील 110 पंप सुरू होणार आहेत.  पुढील दोन महिने हे पाणी सुरू राहणार आहे. पुढील सहा दिवसांत मिरज, कवठेमहांकाळ, तासगाव तालुक्यात आणि आठ दिवसात ते पाणी जत तालुक्यात जाईल, असा अंदाज गुणाले यांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे सुमारे 35 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांना याचा लाभ होणार आहे. 

Tags : Sangli, Sangli News, 15  crore,  Mhaisal water scheme