Fri, Apr 19, 2019 07:58होमपेज › Sangli › गुंड भावशाला १४ दिवसांची पोलिस कोठडी

गुंड भावशाला १४ दिवसांची पोलिस कोठडी

Published On: May 13 2018 2:17AM | Last Updated: May 12 2018 11:44PMइस्लामपूर : वार्ताहर

रेठरेधरण (ता. वाळवा) येथील संताजी खंडागळे यांच्या खूनप्रकरणी गुंड भावशा उर्फ भाऊसाहेब वसंत पाटील (वय 38) याला इस्लामपूर पोलिसांनी  ताब्यात घेतले. शनिवारी त्याला मोठ्या पोलिस बंदोबस्तात न्यायालयात हजर करण्यात आले.  न्यायालयाने त्याला 24 मे पर्यंत (एकूण 14 दिवस) पोलिस कोठडी सुनावली. 8 वर्षे फरार असलेल्या भावशाला शुक्रवारी  गुंडाविरोधी पथकाने पंढरपूर येथे जेरबंद केले होते. 

3 खून, खुनाचे प्रयत्न, चोर्‍या असे 13 गुन्हे दाखल असलेला भावशा ऑक्टोंबर 2010 पासून फरार होता. फरार असतानाच त्याने डिसेंबर 2016 रोजी रेठरेधरण येथे येवून संताजी खंडागळे यांचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून केला होता. याप्रकरणी पोलिसांनी त्याच्या साथीदारांना यापुर्वी अटक केली आहे. भावशा मात्र फरार होता. रेठरेधरण येथीलच धनाजी पाटील याचाही 14 जानेवारी 2010 ला भावशाने खून करून प्रकाश पाटील यांच्यावर गोळीबार केला होता. 

यानंतर विटा येथील गुंड संजय कांबळे याच्या खून प्रकरणाचा तपास करणार्‍या विशेष पथकाने 30 ऑगस्ट 2010 रोजी छत्तीसगड येथून त्याला अटक केली होती. न्यायालयीन सुनावणीसाठी येथील न्यायालयात दि. 18 ऑक्टोबर 2010 रोजी आणले असता त्याने पोलिसांच्या हातावर तुर्‍या देवून पलायन केले होते. तेंव्हापासून तो फरार होता. 

शुक्रवारी गुंडाविरोधी पथकाने त्याला अटक केल्यानंतर रात्री इस्लामपूर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. आज सकाळी मोठ्या पोलिस बंदोबस्तात त्याला येथील न्यायालयात हजर करण्यात आले. यावेळी गुंडाविरोधी पथकाचे अधिकारीही उपस्थित होते. पोलिसांनी भावशा याने फरारी कालावधीत आणखी काय-काय गुन्हे केले आहेत, तसेच त्याला कोणी मदत केली, त्याचे साथीदार कोण आहेत, तसेच खून प्रकरणात वापरलेली शस्त्रे ताब्यात घ्यायची आहेत. त्यामुळे त्याला जास्तीत जास्त पोलिस कोठडी देण्याची न्यायालयात मागणी केली. यावर न्यायालयाने त्याला 15 दिवसाची पोलिस कोठडी सुनावली. पोलिस निरीक्षक प्रताप मानकर अधिक तपास करीत आहेत.