Fri, Aug 23, 2019 14:49होमपेज › Sangli › कडेगाव तालुक्यात केवळ 13 टक्के पाणीसाठा

कडेगाव तालुक्यात केवळ 13 टक्के पाणीसाठा

Published On: Jul 23 2018 1:11AM | Last Updated: Jul 22 2018 9:18PMकडेगाव : रजाअली पिरजादे 

ऐन पावसाळ्यात कडेगाव तालुक्यातील तलावात केवळ 13 टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. दरम्यान, तालुक्यात खरीप पिकांच्या नव्वद टक्के पेरण्या झाल्या असून पिकांची उगवण चांगली झाली आहे.     

कडेगाव हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. परंतु टेंभू, ताकारी या सिंचन योजनामुळे तालुक्याचे भाग्य उजळले आहे.तालुक्यात पावसाची सरासरी साडे पाचशे ते सहाशे मि.मी. एवढी आहे.परंतु आतापर्यंत सुमारे दोनशे मि.मी. पाऊस झाला आहे. तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र अठ्ठावन हजार हेक्टर आहे. त्यापैकी पेरणीयुक्‍त सत्तावीस हजार पाचशे हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी साडेबारा हजार हेक्टर क्षेत्रावर खरिपाची पेरणी झाली आहे.त्यामध्ये संकरीत ज्वारी, सोयाबीन, घेवडा, भुईमूग, मूग, चवळी या पिकांचा समावेश आहे. सर्वाधिक पेरणी सोयाबीन आणि ज्वारीची झाली आहे. कृषी खात्याकडून शेतकर्‍यांना प्रायोगिक तत्वावर सोयाबीन, ज्वारी, भुईमूगचे प्लॉट देण्यात आले आहेत.

तालुक्यात खरीप पिकाबरोबर उसाच्या क्षेत्रातही वाढ झाली आहे. सुमारे अठरा हजार हेक्टरवर उसाचे क्षेत्र आहे. पाचशे हेक्टर क्षेत्रामध्ये फळबाग, भाजीपाला आणि आले पिकाची लागवड झाली आहे. तालुक्यात कडेगाव, करांडेवाडी, शाळगाव-बोंबाळेवाडी, शिवाजीनगर, कोतीज, चिंचणी यासह विविध छोटे-मोठे तलाव असून शिवाजीनगर तलाव सोडून तालुक्यात कोणतेही तलावात पूर्णक्षमतेने भरलेले नसून या तलावात पाणीसाठा कमी आहे. 

शिवाजीनगर तलावात कायमस्वरूपी टेंभूचे पाणी सोडले जाते. त्यामुळे हा तलाव पूर्णक्षमतेने भरला आहे. अन्य तलावात पंधरा ते चाळीस टक्केच पाणीसाठा आहे. तालुक्यात येरळा आणि नांदणी या दोन प्रमुख नद्या आहेत. महादेव ओढा, कडेगाव ओढा, सोनहिरा ओढा, निमसोड ओढा,  मोठे ओढे आहेत. परंतु अद्याप दमदार पाऊस नाही. त्यामुळे नाले, ओढे तुडुंब भरून वाहिले नाहीत.

कडेगाव तलावात टेंभू योजनेचे पाणी पूर्ण क्षमतेने सोडले जात नाही.त्यामुळे हा तलाव पूर्णपणे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असतो. टेंभू कार्यालयातील अधिकार्‍यांनी सांगितलेल्या माहितीनुसार या तलावात केवळ तेरा टक्के पाणीसाठा आहे. या तलावात कडेगाव, कडेपूर, नेर्ली, अपशिंगे,कोतवडे आदी गावांच्या नळपुरवठा विहिरी आहेत. हा तलाव अधिकृतरित्या टेंभू योजनेच्या लाभ क्षेत्रात समाविष्ट करावा, अशी लोकांची मागणी आहे.दरम्यान, तालुक्यात मोठा पाऊस झाला नसला तरी नेहमीच्या रिपरिप किंबहुना जिरवणीच्या पावसामुळे खरिपाची उगवण आणि पिकांची परिस्थिती चांगली आहे. या पावसामुळे सर्वत्र हिरवळ पसरली असून जनावरांच्या वैरणीचा प्रश्‍न मिटला आहे. तर अनेक गावांची पिण्याच्या पाण्याची समस्या दूर झाली आहे.    

कृष्णेच्या वाहून जाणार्‍या पाण्याने तलाव भरून घ्यावे 

टेंभूचे पाणी कडेगाव तालुक्यासह दुष्काळी आटपाडी, खानापूर आणि सांगोला तालुक्याला जाते. संततधार पावसामुळे सध्या कृष्णा नदीला पाणी आले असून हे पाणी कर्नाटकात वाहून  जात आहे. हे पाणी कडेगावसह दुष्काळी तालुक्याला देऊन तेथील तलाव भरून घ्यावेत, अशी लोकांकडून मागणी होत  आहे.