Wed, Jul 17, 2019 08:47होमपेज › Sangli › आजपासून बारावीची परीक्षा सुरु

आजपासून बारावीची परीक्षा सुरु

Published On: Feb 21 2018 1:12AM | Last Updated: Feb 20 2018 9:28PMसांगली ः प्रतिनिधी

बारावीची परीक्षा बुधवारपासून सुरू होत आहे. जिल्ह्यात 45 केंद्रांवर 36 हजार 885 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. परीक्षा सुरळीत पार पडावी. कॉपी आदी गैरप्रकार होऊ नयेत यासाठी भरारी पथके नियुक्त केली आहेत. परीक्षा केंद्रावर अडथळे निर्माण केल्यास, कॉपीस सहाय्य केल्यास संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल केला जाणार आहे, असे शिक्षणाधिकारी महेश चोथे यांनी सांगितले. 

उच्च माध्यमिक (बारावी) परीक्षा बुधवारपासून तर माध्यमिक शालांत  (दहावी) प्रमाणपत्र परीक्षा दि. 1 मार्चपासून सुरू होत आहे. जिल्ह्यातून दहावी व बारावीचे 80 हजार 704 परीक्षार्थी आहेत.  बारावीसाठी 45 केंद्रांवर 36 हजार 885 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. यामध्ये 20 हजार 872 विद्यार्थी व 16 हजार 13 विद्यार्थिनी आहेत. बुधवारी इंग्लिशचा पहिला पेपर आहे. दहावी परीक्षा दि. 1 ते 24 मार्चला होणार आहे. 

विद्यार्थी मनावर दडपण, दहशत निर्माण होऊ नये. परीक्षा शांततेत व सुरळीतपणे पार पडाव्यात, कॉपी व अन्य गैरप्रकार घडू नयेत यासाठी परीक्षा केंद्र परिसरात पोलिस अधिनियम 37 (1) (3) चा वापर, भरारी पथके, बैठी पथके नियुक्तीचे आदेश आहेत. केंद्रावर परीक्षाकामी अडथळा, अनियमितता निर्माण केल्यास, कॉपीस सहाय्य केल्यास फौजदारीच्या सूचनाही जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आहेत. त्याचबरोबर परीक्षार्थींना तणावमुक्त वातावरणात परीक्षा देणे शक्य होईल, अशी व्यवस्था करावी. भरारी पथकांनी परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांच्या मनावर दडपण येणार नाही व दहशत निर्माण होणार नाही अशा पद्धतीने भेटी द्याव्यात, असेही जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केले आहे.